उस्मानाबाद : जिल्ह्यासह परिसरातील अनेक नागरिक विविध कामांसाठी पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी विविध भागात वास्तव्यास आहेत़ दिवाळी सणानिमित्त या नागरिकांचा ओढा गावाकडे असल्याने त्यांची गैरसोय होवू नये म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागाकडून जवळपास १०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे़उस्मानाबाद शहरासह परिसरातील अनेक नागरिक पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक शहरात कामानिमित्त वास्तव्यास आहेत़ विशेषत: खासगी नोकरीसाठी गेलेल्या युवकांची, कुटुंबाची संख्या यात अधिक आहे़ दिवाळी हा महत्त्वाचा सण असल्याने ही मंडळी गावाकडे परततात़ मात्र, गावाकडे परतणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने बसेससह इतर वाहनाअभावी प्रवाशांची गैरसोय ठरलेली असते़ ही गैरसोय टाळण्यासाठी उस्मानाबाद आगाराने जवळपास १०० बसेसचे नियोजन केले आहे़ सद्यस्थितीत उस्मानाबाद आगारातून सहा, उमरगा आगारातून नऊ, भूम आगारातून १३, तुळजापूर विभागातून सहा, कळंब आगारातून पाच बसेस पुणे मार्गावर सोडण्यात आल्या आहेत़ तर नाशिककडे कळंब आगारातून एक, औरंगाबादकडे उमरगा आगारातून दोन तर साताऱ्याकडे तुळजापूर आगारातून एक बस असे जादा बसेसचे नियोजन असून, आवश्यकतेनुसार बसेस वाढविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले़ शिवाय पुणे येथील पिंपरी चिंचवड, इंजिनिअरिंग महाविद्यालय, शिवाजीनगर, स्वारगेट येथील बसस्थानकावर दहा कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत असून, हे या भागातील प्रवाशांची सोय पाहत असल्याचे विभाग नियंत्रक नवनित भानप यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
दिवाळीसाठी शंभरावर बसेस
By admin | Updated: October 22, 2014 01:18 IST