औरंगाबाद : ‘होत कसे नाही, झालेच पाहिजे’, ‘वीज बिल माफ झालेच पाहिजे’ अशा घोषणांनी सोमवारी महावितरण कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. कोरोना प्रादुर्भावामुळे नागरिकांना आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मार्च ते डिसेंबरदरम्याचे सर्वांचे वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले) जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, महाराष्ट्र उपाध्यक्ष मिलिंद शेळके, जिल्हा शहराध्यक्ष किशोर थोरात, जिल्हाध्यक्ष अरविंद अवचरमल, जिल्हा कार्याध्यक्ष बाळकृष्ण इंगळे, युवा मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड, लक्ष्मण हिवराळे, देवराज वीर, मुकुंद घोरपडे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक, महिलांची उपस्थिती होती. मागणीसंदर्भात महावितरणच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणा देण्यात आल्या.
जिल्ह्यात वीज बिलासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढत आहे. या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात यावे, कोरोनामुळे नागरिक आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. त्यामुळे मार्च ते डिसेंबर या दरम्यानचे सर्वांचे वीज बिल माफ करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
फोटो ओळ...
वीज माफ करण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले) निदर्शने करताना बाबूराव कदम, मिलिंद शेळके, किशोर थोरात, नागराज गायकवाड व कार्यकर्ते.