चापोली : या गावातील एका शिक्षकाच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासह ४ लाख ८४ हजार रूपयांचा ऐवज पळवून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली़ या चोरट्यांनी गावातील अन्य सात ते आठ घरे फोडण्याचा प्रयत्नही केला़ या घटनेमुळे गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे़ चाकूर तालुक्यातील चापोली येथील सहशिक्षक असलेले मनोज मुदाळे व त्यांचे कुटुंबीय बुधवारी रात्री जेवण करून घरी झोपले होते़ रात्री ११ ते १ च्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी मुदाळे यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला़ खोलीतील कपाट तोडून साडेसतरा तोेळे सोन्याचे दागिणे (५ तोळ्यांच्या पाटल्या, ६ तोळ्यांचा पोहेहार, ४ तोळ्याच्या बांगड्या, १ तोळ्याचे लॉकेट, १ तोळ्याची अंगठी) यासह रोख २१ हजार रूपयांचा ऐवज पळविला़ सोन्याच्या दागिण्यासह रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८४ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला़ चोरट्यांनी मुदाळे यांचे घर साफ केल्यानंतर गावातील अन्य ७ ते ८ घरांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला़ त्यात काहींच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे गुरुवारी सकाळी निदर्शनास आले आहे़ मुदाळे यांनी गुरुवारी सकाळी उठून पाहिले असता सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले़ त्यामुळे आपल्या घरची चोरी झाली असल्याचे समजले़ याप्रकरणी मनोज मुदाळे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सपोनि़ शिवाजी जावळे करीत आहेत़घटनास्थळास पोलीस उपाधिक्षक वैशाली शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली़ तसेच चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले़ परंतु, त्यास यश आले नाही़ (वार्ताहर)
शिक्षकाच्या घरी पाऊणेपाच लाखांची चोरी
By admin | Updated: March 27, 2015 00:31 IST