औरंगाबाद : कोरोनाग्रस्त रुग्ण जेवायला, बाथरूमला गेला तरी ऑक्सिजनचा पुरवठा सुरूच असतो. पोर्ट, लाईनमधील गळत्या थांबविल्या पाहिजेत. रुग्ण झोपल्यानंतर, जेवत असताना किंवा बाथरूमला गेल्यानंतरही ऑक्सिजन पुरवठा सुरूच असतो. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी केल्या.
मुक्तहस्ते ऑक्सिजन वापरला जात असेल तर परिस्थिती बिकट होईल. गरजेपेक्षा अधिक ऑक्सिजन देऊ नका. घाटीसह सर्व हॉस्पिटल्स, ‘साहेब ऑक्सिजन संपले’ असे सांगून गप्प बसत आहेत. रुग्णाची परिस्थिती पाहून ऑक्सिजन दिला पाहिजे. वारेमाप ऑक्सिजन वापरला गेला तर गरजू रुग्णांना तो मिळणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक सरकारी हॉस्पिटलच्या ऑक्सिजन पुरवठ्याचे ऑडिट करण्यासाठी त्रयस्थ डॉक्टर्स नेमण्याचे संकेतही त्यांनी बैठकीत दिले.
ऑक्सिजन मॅनेजमेंटमध्ये प्रशासनाची पुरती दमछाक सुरू आहे. ऑक्सिजन वितरण व्यवस्थापन नीट न झाल्यामुळे सगळी यंत्रणा कोलमडली असून बेल्लारीवरून दोन टँकर निघाले आहेत, ते दोन दिवसात येणार आहेत. हिंगोलीमध्ये देखील परिस्थिती बिकट बनलेली आहे. हॉस्पिटलमध्ये योग्यरित्या ऑक्सिजन वितरणाची काळजी घेतली जात नसून पोर्ट उघडे राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रुग्ण जागेवर नसला तरी ऑक्सिजन सुरूच असल्याचे आढळून आले. बेड्स, रेमडेसिविरचा पुरवठा, ऑक्सिजनचा गैरवापर यासाठी पाच बैठका आजवर झाल्या आहेत. गळती बंद केली, तर औरंगाबादला ६२ टन ऑक्सिजन लागणार नाही. खासगी हॉस्पिटल्स आणि सरकारी हॉस्पिटल्सचे ऑडिट सुरू केले आहे. २७ टन ऑक्सिजन घाटीला कसा काय लागतो? खासगी रुग्णालयात तेवढे रुग्ण असताना ऑक्सिजन कमी लागतो? आहे. मग घाटीला कसा काय जास्त लागतो? काही ठिकाणचे पोर्ट खराब असतील तर तेथून गळती होत असेल. त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी वेगाने प्रयत्न
ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन्स जास्त प्रमाणात मिळावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विभागात सर्व ठिकाणांहून ऑक्सिजन, इंजेक्शनची मागणी वाढते आहे. वरिष्ठ पातळीवर संपर्क सुरू असून आठवडाभरात परिस्थिती सुधारेल. बीडला ऑक्सिजनचा तुटवडा आहे. बेल्लारी, चाकण, हैदराबाद येथे ऑक्सिजन टँकर भरून मिळावेत, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. बुधवारचा पूर्ण दिवस ऑक्सिजन मिळविण्यासाठी सगळी यंत्रणा कार्यरत होती. आयुक्तालयातील अप्पर आयुक्तांना ऑक्सिजनसाठी फिलिंग स्टेशनपर्यंत पाठविले, असेही विभागीय आयुक्त केंद्रेकर म्हणाले.