जालना : नगर पालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील विविध भागात सामाजिक उपक्रमांसाठी सामाजिक सभागृह बांधली आहेत. त्यांची आज दुरवस्था झालेली आहे. एका सामाजिक सभागृहाचा वापर तर चक्क घोडे बांधण्यासाठी केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. नगर पालिकेने विशेष निधीतून सुसज्ज सामाजिक सभागृहांची उभारणी केली. सर्वसामान्य कुटुंबांना लग्न कार्यकार्य अथवा काही सामाजिक उपक्रम घेण्यासाठी हे सभागृह बांधण्यात आले. काही दिवस सुस्थितीत असलेली ही सभागृहे कचराकुंड्या बनले आहेत. दारे, खिडक्या तुटलेल्या, काही ठिकाणी साहित्याचीही चोरी झालेली आहे. जुना व नवीन जालना भागात मिळून नगर पालिकेने बांधलेली दहापेक्षा अधिक समाज मंदिरे आहेत. नगर पालिकेने बांधलेल्या या सामाजिक सभागृहांना आठ ते दहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. रविवारी काही सभागृहांची पाहणी केली असता दुर्गंधी व कचरा पाहून येथे थांबणेही जिकिरीचे बनले होते. परिसरातील नागरिकांसाठी हे सभागृह महत्वपूर्ण होते. मात्र नागरिकांच्या दुर्लक्षामुळे या सभागृहांची स्थिती वाईट आहे. (प्रतिनिधी)
शहरातील सामाजिक सभागृह बनले घोड्यांचा तबेला
By admin | Updated: November 22, 2015 23:40 IST