औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे (घाटी) अधिष्ठाता डॉ. के.एस. भोपळे हे ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त घाटी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा सेवागौरव करण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या महात्मा गांधी सभागृहात हा समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त प्रभारी अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण होत्या. याप्रसंगी सत्कारमूर्ती डॉ. के.एस. भोपळे आणि त्यांच्या पत्नी शांता भोपळे यांचा सत्कार गौरव समितीकडून आणि विविध कर्मचारी, अधिकारी संघटनांकडून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विश्वनाथ भोपळे, डॉ. अरुण गुजराथी, डॉ. एस.टी. खान, डॉ. भास्कर खैरे, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. मंगला बोरकर, डॉ. अविनाश मगरे, मेट्रन छाया चामले यांची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. भोपळे यांचा जीवनपट दाखविणारी लघु चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या सत्काराला उत्तर देताना डॉ. भोपळे म्हणाले की, ३६ वर्षांच्या शासकीय सेवेत केवळ रुग्ण आणि विद्यार्थी यांनाच केंद्रबिंदू मानून आपण काम केले. अधिष्ठातापदी कार्यरत असताना आपण बऱ्याचदा आपल्या सहकाऱ्यांवर रागावलो. मात्र, ते केवळ रुग्णहित लक्षात घेऊनच. यावेळी डॉ. मंगला बोरकर, डॉ. खान, डॉ. दिवाण, डॉ. खैरे, डॉ. पी.एल. गटणी, डॉ. गायकवाड, डॉ. मिर्झा सिराज बेग यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. वैशाली उणे, डॉ. राजश्री, यशवंत कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. भारत सोनवणे यांनी मानले.
सेवानिवृत्तीनिमित्त घाटीचे अधिष्ठाता भोपळे यांचा गौरव
By admin | Updated: November 30, 2014 01:00 IST