तेर : राज्य सरकारने संरक्षित केलेल्या तालुक्यातील तेर येथील संत गोरोबा काका यांच्या वाड्यामध्ये मंगळवारी मोठ्या उत्साहात गृहप्रवेशाचा सोहळा पार पडला. प्रारंभी रुक्मिणी मंगल कार्यालयापासून टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. या दिंडीत कुंभार समाजाचे राज्य अध्यक्ष अशोक सोनवणे, राणाजगजितसिंह पाटील, कुंभार समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विठ्ठल राऊत, महादेव कुंभार, मोहन जगदाळे, नागनाथ कुंभार, संजय राजे, महादेव खटावकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर गिनिज बुक मध्ये सर्वात कमी उंचीची मुलगी म्हणून नोंद असलेल्या ज्योती अंबी हिच्या हस्ते फित कापून गृहप्रवेश करण्यात आला. तेर येथील संत गोरोबा काकांचे हे निवासस्थान १९७० पासून अतिक्रमित होते. २००३ मध्ये कुंभार समाज व समाजसेवकांनी सदर वाडा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावा, अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यानंतर २००६ मध्ये भाविकांच्या या मागणीची दखल घेत राज्य शासनाने सदर वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला. त्यानंतर सरकारने बाराव्या वित्त आयोगातून २५ लाख रुपयांची तरतूद करून सदर वाड्याचे काम पूर्ण केले. राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात असलेली ही वास्तू बांधताना तिचा पुरातन बाज कायम राहील, याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. (वार्ताहर)
संत गोरोबाकाका वाड्यात गृहप्रवेश
By admin | Updated: June 11, 2014 00:32 IST