तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने व विधिवत पूजन करून महंत तुकोजीबाबा व भोपी पुजारी अक्षय पाटील यांच्या हस्ते होळी प्रज्वलित करण्यात आली. यावेळी बॅण्ड व संबळाच्या वाद्यात ‘आई राजा’चा जयघोष करीत उपस्थित पुजारी व देवी भाविकांनी होळीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा मारून परंपरा प्रथेनुसार बोंब ठोकली. त्यानंतर शहरातील सार्वजनिक होळी प्रज्वलित करण्यात आल्या.रविवार सुट्टीचा दिवस आणि पौर्णिमा असल्यामुळे हजारो भाविकांनी देवीदर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. सायंकाळची अभिषेक घाट सहा वाजता झाली. त्यानंतर सात वाजता नित्योपचार पंचामृत अभिषेक पार पडले. त्यानंतर संबळांच्या वाद्यात अंगारी विधी संपन्न झाला. दरम्यान, याचवेळी शहरातील पुजारी व रहिवाशांनीही होळीस पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर महंत तुकोजीबाबा, भोपी पुजारी अक्षय पाटील, भोपी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, सेवेकरी अंबादास औटी यांनी होळीची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखवून धुपारती करून होळी प्रज्वलित केली. यावेळी बॅण्ड व संबळाचा आवाज तसेच देवीच्या जयघोषामुळे मंदिरातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. होळी प्रज्वलित झाल्यानंतर पुजारी व भाविकांनी होळी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी व्यवस्थापक सुजित नरहरे, पो.नि. राजेंद्र बोकडे, भोपी पुजारी सुधीर कदम, शशी पाटील, विकास मलबा, संजय सोंजी, निलेश परमेश्वर, पुजारी मंडळाचे संचालक सुधीर रोचकरी, राजाभाऊ क्षीरसागर, पाळीकर पुजारी, सेवेकरी, मंदिर कर्मचारी व देवीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर महाद्वार चौक, आर्य चौक, कमान वेस, खडकाळगल्ली, जवाहर चौक, दीपक चौक, भवानी रोड, किसान चौकी या ठिकाणच्या सार्वजनिक होळी प्रज्वलित करण्यात आल्या व पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव शहरात साजरा करण्यात आला.
तुळजाभवानी मंदिरात होळी उत्सव
By admin | Updated: March 12, 2017 23:11 IST