लातूर : बड्या उद्योगपतींची कर्जे माफ करुन, त्यांना देशाबाहेर पळून जायला मदत केल्यावर आर्थिक संकटात सापडलेल्या बँकांमध्ये जनतेच्या खिशातला कष्टाचा पैसा सक्तीने जमा केला़ त्यानंतर तो काढण्यावर नवनवीन नियमांद्वारे बंदी घालून बँकांना गब्बर करण्याचा प्रयत्न गब्बरसिंग मोदींनी केल्याची टीका प्रसिद्ध साहित्यिक डॉ़ प्रज्ञा दया पवार यांनी शनिवारी लातुरात केली़अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या़ प्रज्ञा पवार म्हणाल्या, नोटाबंदीमुळे सरकारने एकप्रकारे कृत्रीम स्वरुपाचा नवाच तीव्र दुष्काळ निर्माण केला आहे़ हा दुष्काळ गरीब शेतकऱ्यांचे, शेतमजूर, वंचित अन् विशेषत: स्त्रिया यांना भरडणारा ठरला आहे़ गरीबांचे, स्त्रियांचे, छोट्या उद्योजकांचे, स्वयंरोजगार करणाऱ्याचे यामुळे अपरिमित नुकसान झाले आहे़ हे सगळे होताना सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांकडून डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या चलनविषयक विधानांचा गैरवापर केला जात असल्याची टीकाही प्रज्ञा पवार यांनी केली़ राज्यभरात सध्या निघत असलेल्या वेगवेगळ्या क्रांती मोर्चांबद्दल त्या म्हणाल्या, जातींचे महामोर्चे काढणे ही आजच्या काळात सोपीच बाब बनली आहे़ राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे पीक आले़ त्यात प्रतिगामी व पुरोगामी खांद्याला खांदा लावून चालू लागले़ तेव्हा सगळ्यांनाच काहिसं हबकायला झालं़ पण लवकरच मग दलितांचे, ओबीसींचे व मुस्लिमांचेही लाखा-लाखांचे मोर्चे निघू लागले़ या निमित्ताने अॅट्रासिटी कायद्याची उलटसुलट चर्चा झाली़ जातीय अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला़ देशाच्या व्यवहारातून जात संपली आहे, जी थोडीफार जीवंत आहे ती दलित, मागासांमुळेच असं मानणाऱ्या प्रस्थापितांची बोलती यामुळे बंद झाली़ अस्मितादर्शविषयी बोलताना त्या म्हणाल्या, अस्मितादर्शचे सांस्कृतिक, वाङ्मयीन योगदान ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे़ मराठी साहित्यात साठ-सत्तरच्या आगेमागे फुले-आुंबेडकरवादी विचारविश्वातून प्रेरणा घेत ‘दलित साहित्य’ नावाची महत्वाची साहित्य चळवळ निर्माण झाली़ हा भारतातील सर्वात मोठा तलस्पर्शी वैचारिक झंझावात होता़ या वैचारिक उर्जेला साक्षात रण्याची, सर्जनशील राखण्याची, प्रवाही ठेवण्याची सर्वार्थाने कष्टप्रद असलेली ध्येयनिष्ठ वाटचाल प्रतिकूल परिस्थितीतही डॉग़ंगाधर पानतावणे यांच्या माध्यमातून अस्मितादर्शने अव्याहतपणे सुरु ठेवल्याचे प्रज्ञा पवार यांनी सांगितले़ बोलण्याचे विषय तर बरेच आहेत़ तरीपण मी बोलणार आहेच, असेही त्या म्हणाल्या़
अस्मितादर्शचे सांस्कृतिक-साहित्यातील योगदान ऐतिहासिक !
By admin | Updated: January 15, 2017 01:10 IST