व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना बसण्यासाठी मोठी खुर्ची ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी खुर्ची बाजूला करून साधी खुर्ची मागविली.
सभामंडपात तीनशे नागरिक बसण्याची व्यवस्था केली होती. मात्र, तेवढे निमंत्रित आले नाहीत. त्यामुळे पाठीमागील बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या.
शेवटच्या क्षणी पाठीमागील खुर्च्यांवर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलावून बसविण्यात आले.
महापालिकेच्या कार्यक्रमास विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक उपस्थित नव्हते. शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभामंडपात घोषणा देण्यासाठी शिवसेनेने बुलंद आवाज असलेल्या माजी नगरसेवक बंडू ओक यांना पाचारण केले होते.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर दोन दिवसांपूर्वी तापाने फणफणले होते. काल त्यांनी कोरोना तपासणी करून घेतली. त्यात ते निगेटिव्ह आले. आज कामालासुद्धा लागले. नेहमी ते इतरांवर खेकसत असतात. काल मी त्यांना ओरडून आराम करण्याचा सल्ला दिला होता, विभागीय आयुक्तांची अशी स्तुती मुख्यमंत्र्यांनी केली.
महापालिका प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांनी प्रास्ताविक करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादसाठी देवदूत असल्याचे नमूद केले.