उस्मानाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही निवड प्रक्रिया विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असल्याने कुठल्याही सदस्याची नाराजी ओढावून घेणे श्रेष्ठींना परवडणारे नाही. असे असतानाच विद्यमान पदाधिकाऱ्यांना ४० ते ४१ दिवसांचा कालावधी कमी मिळाल्याचे सांगत काँग्रेसचे कृषी सभापती पंडित जोकार यांनी १६ सप्टेंबर रोजी हायकोर्टामध्ये निवडीविरूद्ध हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासनाने पक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदस्यांना नोटिसाही पाठविण्यात आल्या आहेत. राजकीय हालचालींना वेगही आला आहे. काँग्रेसने सदस्यांची एकत्रिक बैठक घेवून त्यांचे मत जाणून घेतले आहे. मात्र, ही निवडप्रक्रिया विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असल्याने पक्षश्रेष्ठींची कोंडी झाली आहे. अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी सुटले असल्याने इच्छुकांची संख्याही मोठी आहे. कोण्या एका सदस्याला अध्यक्षपदी विराजमान केले तर दुसऱ्या सदस्यांची नाराजी ओढावणार हे निश्चित असल्याने ही निवड प्रक्रिया विधानसभेनंतर व्हावी, असे पक्षश्रेष्ठींना वाटत होते. त्यानुषंगाने कोर्टातून निवडीला स्थगिती मिळविता, येते का याबाबत निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून विचार विनिमय सुरू होता. असे असतानाच १६ सप्टेंबर रोजी काँग्रेसला कोर्टामध्ये धाव घेण्यायोग्य मुद्दा गवसला. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसून आणखी ४० ते ४१ दिवस बाकी असल्याचे सांगत त्यांनी आक्षेप नोंदविला आहे. याच मुद्याला धरून पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या विश्वासातील म्हणून ओळख असलेले कृषी सभापती पंडित जोकार यांनी १६ सप्टेंबर रोजी अॅड. धनंजय ठोके यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर १९ सप्टेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी सुनावणी होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे उद्याच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी
By admin | Updated: September 19, 2014 01:00 IST