औरंगाबाद : इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या संपर्कात राहून देशात घातपात करण्याचा कट रचल्याप्रकरणी ‘एटीएस’ने काही तरुणांना नुकतीच अटक केली. तपासात औरंगाबादेतील पोलीस अधीक्षक कार्यालयाची त्यांनी रेकी केल्याचे समजले. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक प्रवाशावर विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठी एका प्रवाशाची दोनदा तपासणी केली जात आहे.इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून १३ आणि २३ जुलै रोजी दोघांना अटक करण्यात आली. यावेळी एटीएसच्या पथकाने एक किलो ६०० ग्रॅम घातक स्फोटके जप्त केली. औरंगाबादेतील पोलीस अधीक्षक कार्यालय त्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे उघड झाले. त्यानंतर परभणीत ७ आॅगस्ट रोजीही एका संशयितास अटक करण्यात आली. ‘इसिस’च्या संपर्कात असलेल्यांकडून औरंगाबाद शहर टार्गेट केले जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर चिकलठाणा विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने २२ आॅगस्टपर्यंत विमानतळावरील व्हिजिटिंग तिकीट विक्रीदेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळावर अतिदक्षतेची सूचना देण्यात आली आहे. परंतु स्वातंत्र्य दिनासह मराठवाड्यात ‘इसिस’च्या संपर्कातील व्यक्ती समोर आल्याने चिकलठाणा विमानतळावर सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी खास अत्याधुनिक तपासणी यंत्रणा ‘सीआयएसएफ’ला मिळाली आहे. या यंत्रणेद्वारे अंमली पदार्थासह स्फोटके शोधणे अधिक सोपे झाले आहे. ‘सीआयएसएफ’च्या जवानांची गस्त वाढविण्यात आली आहे, अशी माहिती ‘सीआयएसएफ’च्या सूत्रांनी दिली.
‘इसिस’च्या पार्श्वभूमीवर विमानतळावर हाय अलर्ट
By admin | Updated: August 11, 2016 01:25 IST