औरंगाबाद : चंदीगड येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ज्युदो स्पर्धेत हर्षल थिटे याने जबरदस्त कामगिरी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला रौप्यपदक जिंकून दिले आहे. हर्षल थिटे याने हे रौप्यपदक ८१ किलो वजन गटात जिंकले आहे. हर्षल थिटे याच्याप्रमाणेच श्रवण शेडगे यानेही चंदीगड येथील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ज्युदो स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवला आहे. अनेक राज्यस्तरीय स्पर्धेत पदकांची लयलूट करणाºया श्रवण शेडगे याने ५६ पेक्षा कमी वजन गटात कास्यपदकाची कमाई केली आहे. हे दोन्ही खेळाडू खुलताबाद येथील चिश्तिया महाविद्यालयाचे आहेत. विद्यापीठ परिसरात ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात हे दोघेही सराव करतात. त्यांना आंतरराष्ट्रीय ज्युदो प्रशिक्षक विजय धिमान यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, संतोष कुन्नपाडा आदींनी या दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
आंतरविद्यापीठ ज्युदो स्पर्धेत हर्षलला रौप्य, श्रवणने जिंकले कास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:57 IST