---
औरंगाबाद : जिल्ह्यात लाळ खुरकुत लसीकरण, टॅगिंगचे काम सध्या सुरू आहे. त्यात पशुसंवर्धनाची ५० टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम कामावर होत आहे. ज्या पशुचिकित्सालयात चतुर्थश्रेणी पद रिक्त आणि वर्ग १ व २च्या पदांसह पशुपर्यवेक्षक काम करत आहेत, त्यांच्या मदतीला ग्रामपंचायतीने एक कर्मचारी उपलब्ध करून द्यावा, असे आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी दिले आहेत.
मुंबई ग्रामपंचायत नियम, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या तरतुदीनुसार सार्वजनिक जागा, बांधकाम स्वच्छ करण्याची तसेच पशुधनाची सर्वसामान्य काळजी घेणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ज्या ग्रामपंचायतींकडे दोन कर्मचारी आहे, त्यांनी एक कर्मचारी आणि ज्यांच्याकडे एकच कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना रिक्त पदे असलेल्या पशुचिकित्सालयातही मदतीचे आदेश देण्यात यावे, असे कवडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांच्या मान्यतेनुसार पशुधनाचे लसीकरण व टॅगिंगला गती देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे कवडे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील १२८ पैकी श्रेणी एकचे ३८, तर श्रेणी दोनचे ४६ असे ८४ पशुवैद्यकीय दवाखाने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत चालवले जातात. यातील जिल्हा परिषदेच्या दवाखान्यांत पशुसंवर्धन अधिकारी १९, सहायक पशुसंवर्धन अधिकारी ५, पशुधन पर्यवेक्षक ९, व्रण उपचारक १६, कक्ष अधिकारी १ अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत, तर परिचरची ३६ पदे रिक्त असल्याने ऑनफिल्ड व ऑनलाइन कामावरही परिणाम झाल्याचे आता ग्रामपंचायतीच्या मदतीने या कामाला गती देऊ असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी सांगितले.