भूम : पत्नीच्या पश्चात मुलींना पित्याबरोबरच आईचीही माया देऊन सांभाळ करीत असलेल्या येथील नवनाथ गायकवाड आजारामुळे त्रस्त आहेत. त्यातच या मुलीच्या ठरलेल्या लग्नासाठी त्यांच्यासमोर पैशांची अडचण होती. मात्र, गायकवाड यांची ही व्यथा लक्षात घेऊन अनेकांनी त्यांच्या मदतीसाठी हात पुढे केले असून, शनिवारी कळंब तालुक्यातील बाभळगाव येथे हा विवाह होत आहे. शहरातील न्यायालयाच्या मागील लक्ष्मी नगरात नवनाथ गायकवाड हे दोन मुलींसोबत राहतात. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याने दोन्ही मुलींचा त्यांनी आईच्या प्रेमाची उणिव भासू न देता सांभाळ केला. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ते भूममध्ये भंगार गोळा करीत होते. मात्र, अशाही परिस्थितीत त्यांनी दोन्ही मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. मात्र, दोन वर्षांपूर्वी त्यांना किडनीच्या आजाराने ग्रासले. याच्या उपचाराचा भार त्यांच्यावर पडला. त्यामुळेच मुलीच्या लग्नाची आर्थिक अडचण निर्माण झाली. ही बाब कपडा बँकेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या फैैजान काझी, बख्तीयार काझी, सुधीर गोसावी, रवी भागवत, जावेद मोमीन आदींना समजल्यानंतर त्यांनी गायकवाड यांना संसारोपयोगी भांडी देवून मदतीची सुरूवात केली. दरम्यान, ‘लोकमत’नेही गायकवाड यांच्या मदतीसाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला अर्जुनराव लोहकरे, जी. डी. सूळ, उमेश मनगिरे, बालाजी कुंभार यांनी प्रतिसाद दिला. याबरोबरच पोलिस निरीक्षक खाडे यांनीही स्वत: गायकवाड यांची भेट घेऊन आर्थिक मदत केल्याने गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)
‘त्या’ वधूपित्याला अनेकांकडून मदत
By admin | Updated: December 24, 2016 00:51 IST