उस्मानाबाद : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘हेल्मेट’सक्तीबाबत शासन विचाराधीन असून, दुचाकी खरेदीवेळीच दोन हेल्मेट पुरविण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे़ दुचाकीच्या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने मयत आणि गंभीर जखमी होणारे चालक पाहता ‘हेल्मेट’ची गरज व्यक्त होते़ याबाबत ‘लोकमत’ने रविवारी केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या नागरिकांपैकी केवळ ३३ टक्के नागरिकांकडे ‘हेल्मेट’ असल्याचे समोर आले आहे़ रस्ता अपघातात दुचाकींच्या अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे़ विशेषत: शाळा- महाविद्यालयीन युवक-युवती भरधाव वेगात दुचाकी चालविताना दिसून येतात़ वाहन परवाना नसतानाही पालक आपल्या पाल्यांना दुचाकी घेवून देताना दिसत आहेत़ मात्र, भरधाव वेगातील दुचाकीला एखाद्या वाहनाने दिलेली धडक असो अथवा दुचाकी स्लीप होऊन झालेला अपघात असो, यातील ज्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होते, त्या अपघातातील दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आहेत़ तर अनेकांना कायम अपंगत्व आल्याचेही प्रकार घडले आहेत़ त्यातच उच्च न्यायालयाने दाखल याचिकेच्या सुनावणीनंतर दुचाकी चालविणाऱ्या चालकासह मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट वापरणे बंधनकारक असल्याचे निर्देश दिले आहेत़ याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे़ प्रारंभी मोठ्या शहरांमध्ये ‘हेल्मेट’ सक्ती केली जाणार आहे़ वाढलेले अपघात आणि ‘हेल्मेट’ सक्तीबाबत ‘लोकमत’ने रविवारी शहरातील दुचाकी चालकांचे सर्वेक्षण केले़ यात आपणाकडे ‘हेल्मेट’ आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता़ यावर केवळ ३३ टक्के चालकांनी हेल्मेट असल्याचे नमूद केले़ तर तब्बल ७७ टक्के नागरिकांकडे ‘हेल्मेट’ नसल्याचे दिसून आले़ उपलब्ध ‘हेल्मेट’चा वापर करता का ? या प्रश्नावर केवळ ९ टक्के नागरिकांनी आपण हेल्मेटचा वापर करतो, असे मत नोंदविले़ तर १८ टक्के चालकांनी नाही म्हणून तर ६ टक्के चालकांनी आपण कधी-कधी ‘हेल्मेट’ वापरत असल्याचे सांगितले़ ‘हेल्मेट’नसल्याबाबत पोलिसांनी केव्हा कारवाई केली आहे का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता़ यावर १७ टक्के चालकांनी कारवाई केल्याचे सांगिते़ तर ५८ टक्के चालकांनी कारवाई झाली नसल्याचे सांगितले़ तर २५ टक्के चालकांनी कधी-कधी कारवाई होत असल्याचे मत नमूद केले़ (प्रतिनिधी)
‘हेल्मेट’ गरजेचेच
By admin | Updated: February 8, 2016 00:17 IST