औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही दिवस हाती उरले आहेत. निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडू लागल्यानंतर एकाच दिवशी ठिकठिकाणी उपस्थित राहण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हवाई प्रवासाला प्राधान्य दिले. त्यामुळे नियमित विमानांबरोबर हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड विमानांची गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद विमानतळावर गर्दी दिसून येत आहे.केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने (सेंट्रल बोर्ड आॅफ एक्साईज अँड कस्टम्स) चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानतळ देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत कमी दिवसांत जास्तीत जास्त सभा घेण्यावर अनेक पक्षांचा भर असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी एका भागातून दुसऱ्या भागात कमी वेळेत जाण्यासाठी विमान आणि हेलिकॉप्टरची सुविधा महत्त्वाची ठरते. त्यामुळे एकाच दिवशी विविध शहरांमधील सभांना उपस्थित राहण्यासाठी चार्टर्ड आणि हेलिकॉप्टर बुक करण्यात आले. विविध ठिकाणी सभांना उपस्थित राहण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी औरंगाबादचे आंतरराष्ट्रीय विमानतळ महत्त्वाचे ठरले. गेले काही दिवस विमानतळाची धावपट्टी निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त राहिली. दिल्ली, मुंबई मार्गांवर नियमित सेवा देणाऱ्या विमानांबरोबर प्रचाराच्या दिवसांत आकाशात हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड विमानांची घरघर सुरू असल्याचे दिसून आले. राज्यात अनेक व्यक्ती आणि विविध कंपन्यांकडे हेलिकॉप्टर्स किंवा चार्टर्ड विमाने आहेत. निवडणुकीच्या या कालावधीत छोटी विमाने, हेलिकॉप्टर्स भाड्याने देण्याचा व्यवसाय अधिक बहरल्याचे दिसून येत आहे. गोपनीय माहिती असल्यामुळे आलेल्या चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टर्सची संख्या सांगितली जात नाही; परंतु विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या कालावधीत चार्टर्ड विमान तसेच हेलिकॉप्टरने प्रवास करण्यास अनेकांनी प्राधान्य दिले. गेल्या काही दिवसांत चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टर्सची संख्या वाढली, असे विमानतळ संचालक डी.जी. साळवे यांनी सांगितले.
हेलिकॉप्टर अन् चार्टर्ड प्लेनची गर्दी
By admin | Updated: October 10, 2014 00:42 IST