औरंगाबाद : ‘हे यंत्र वापर तुझे कल्याण होईल’ असे आमिष दाखवून तीन भोंदूबाबांनी एका तरुणावर अघोरी उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा उपाय त्या तरुणाला चांगलाच वेदनादायक ठरला असून, सध्या तो तरुण घाटी रुग्णालयात उपचार घेत आहे. तरुणाच्या जिवाशी खेळणाऱ्या अज्ञात भोंदूबाबांविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात जादूटोणा कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, सातारा परिसरातील शंकरनगरातील प्रकाश राजाराम रनित (३५), १९ जुलै रोजी रेल्वेस्टेशन परिसरात नातेवाइकाच्या घरी आला होता. तेथून घरी परतत असताना स्टेशनच्या पार्किंगजवळील मोकळ्या जागेत तीन भोंदूबाबांनी प्रकाशला गाठले. ‘हे यंत्र घे, शरीराच्या अवयवाला लाव, तुझे कल्याण होईल’ असे या बाबांनी त्याला सांगितले. नाही हो करीत अखेर प्रकाशने ते यंत्र घेतले. या बाबांनीच त्याला यंत्र लावून दिले. त्या बदल्यात बाबांनी प्रकाशकडे होते तितके ७० रुपये काढून घेतले. तेथून प्रकाश घरी जाताच त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या. वेदनांनी त्रस्त झालेल्या प्रकाशला अखेर काल घरच्यांनी घाटी रुग्णालयात आणले. तेथे शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी ते लोखंडी यंत्र काढले. या घटनेची एमएलसी मिळाल्यानंतर उस्मानपुरा पोलिसांनी घाटीत जाऊन प्रकाशचा जबाब घेतला. प्रकाशवर अघोरी उपाय करणाऱ्या तिन्ही भोंदूबाबांविरुद्ध जबाबावरून जादूटोणा कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस त्या भोंदूबाबांचा शोध घेत आहेत. भोंदूबाबाने महिलेवर बलात्कार केल्याची घटना ताजी असताना अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला आहे.
भोंदूबाबांनी तरुणावर केला अघोरी उपचार
By admin | Updated: July 23, 2014 00:41 IST