औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्सा विभागात (सीव्हीटीएस) नुकतीच एका महिलेवर दुर्मिळ आणि अवघड अशी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तब्बल दीड-दोन वर्षानंतर ही घाटीत अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वीपणे हृदय शल्यचिकित्सक डॉ. सदानंद पटवारी यांनी केली. घाटीतील हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्सा विभागातील सर्जन डिसेंबर २०१२ मध्ये राजीनामा देऊन निघून गेले. त्यानंतर वर्षभरानंतर या विभागात रुजू झालेले डॉ. सोनी चार -पाच महिनेच घाटीत कार्यरत होते. डॉ. सोनी यांनी या विभागात रुग्णांवर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया केल्या होत्या. मात्र, तब्बल दीड वर्षे हा विभाग सर्जनअभावी कुलूपबंद होता. दरम्यान, तेथे डॉ. सदानंद पटवारी हे सर्जन म्हणून रुजू झाले. डॉ. पटवारी रुजू झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या ओपीडीत तपासणीकरिता येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्याकडे ३५ वर्षीय महिला रुग्ण दाखल झाली. तिला दम लागणे, घाबरल्यासारखे होणे, काम न होणे, छातीत जास्त धडधड होणे असा त्रास सुरू होता. ती दाखल झाली तेव्हा तिच्या फुफ्फुसाच्या रक्त वाहिनीचा दाब वाढला होता. तिला लहानपणापासून अॅट्रल सेक्ट्रल डिफेक्ट नावाचा आजार असल्याचे निदान करण्यात आले, अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, असे रुग्ण हायरिस्क म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अशा रुग्णांची शस्त्रक्रिया करणे आव्हान समजले जाते. डॉ. पटवारी यांनी १५ एप्रिल रोजी त्या महिलेवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णाला दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे डॉ. पटवारी यांनी सांगितले. तब्बल दीड ते दोन वर्षांनंतर अशा प्रकारची हृदय शस्त्रक्रिया सीव्हीटीएसमध्ये झाली.सीव्हीटीएसमध्ये आॅपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना सहाय्य करण्यासाठी निवासी डॉक्टरांची आवश्यकता असते. मात्र, येथे केवळ एकच सर्जन कार्यरत आहेत. ४निवासी डॉक्टर, हाऊस आॅफिसरचीही पदे भरलेली नाहीत. त्यामुळे रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर तो रुग्ण जेव्हा आॅपरेशन थिएटरमधून आयसीयूमध्ये हलविण्यात येतो. तेव्हा त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी निष्णात डॉक्टर नसल्याने डॉ. पटवारी हे शस्त्रक्रियेनंतर तब्बल चार दिवस सीव्हीटीएसमध्ये मुक्काम ठोकून होते. या विभागातील यंत्रसामग्री खाजगी रुग्णालयापेक्षाही सरस आहे. मात्र, परफ्युजनिस्ट आणि असिस्टंट सर्जन, निवासी वैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त आहे. ४त्यामुळे तीन वर्षांपासून या विभागातील बायपास सर्जरीसारख्या मोठ्या शस्त्रक्रिया बंद आहेत.
दीड वर्षानंतर झाली हृदय शस्त्रक्रिया
By admin | Updated: April 26, 2015 01:01 IST