औरंगाबाद : नियोजित सातारा- देवळाई संयुक्त नगर परिषदेबाबत आलेल्या सर्व १९ आक्षेप आणि सूचनांवर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. संबंधितांनी आज जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडले. या सुनावणीचा अहवाल आठवडाभरात नगरविकास खात्याकडे सादर केला जाणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. नगर परिषदेच्या अनुषंगाने एकूण १९ जणांचे अर्ज याआधीच जिल्हा प्रशासनाकडे दाखल झालेले होते. त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. नगर परिषदेच्या प्रस्तावित नकाशात सातारा परिसरातील गट क्रमांक २८ ते ४४ आणि ४६ ते ७५ हे गट वगळण्यात आलेले आहेत. या गटांचाही नगर परिषदेत समावेश करावा, अशी मागणी करणाऱ्या अनेक सूचना प्राप्त झालेल्या होत्या. आजही संबंधित अर्जदारांनी या विषयावर त्यांचे म्हणणे मांडले.सविता कुलकर्णी यांनी सातारा परिसर महानगरपालिकेतच जोडावा, अशी मागणी केली. क्रेडाईतर्फे रवी वट्टमवार, सुनील पाटील, प्रमोद खैरनार, नितीन बगाडिया, विकास चौधरी आदींनी सूचना मांडल्या. नगररचना विभागाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात कोणताही बदल करू नये अशी मागणीही त्यांनी केली. जावेद खान शब्बीर खान, अहमद खान रशीद खान, लतीफ पटेल, मोबीन अय्युब खान, डॉ. नीरज उत्तमानी, अक्षय शिसोदे, मुस्तफा दिलावर खान, फिरोज खान जब्बार खान, रोहन पवार, सरदार खान शब्बीर खान, सातारा- देवळाई नगर परिषद विकास समिती, जमील पटेल, व्यंकटेश शिंदे आदींच्या वतीने यावेळी म्हणणे मांडण्यात आले. प्रशासनाकडून सुनावणीचा अहवाल नगरविकास खात्याला पाठविला जाणार आहे. त्यानंतर अधिसूचना जारी होऊन नगर परिषद अस्तित्वात येणार आहे. सोयगाव, फुलंब्रीबाबत एकही आक्षेप नाहीराज्य सरकारने सोयगाव आणि फुलंब्री येथेही नगर पंचायत स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या नगर पंचायत स्थापनेच्या प्रक्रियेंतर्गत १ जूनपासून ३० जूनपर्यंत आक्षेप आणि सूचना मागविलेल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत याबाबत जिल्हा प्रशासनाकडे एकही आक्षेप प्राप्त झालेला नसल्याचे नगरपालिका प्रशासन विभागाच्या प्रमुख सविता हारकर यांनी सांगितले.
सुनावणीचा अहवाल आठवडाभरात पाठविणार
By admin | Updated: June 28, 2014 01:19 IST