राजन मंगरूळकर, परभणीआरोग्य विभागांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे ठिकठिकाणी उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची गैरसोय होण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य विभागातील मंजूर पदांपैकी रिक्त पदांचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक असल्याने आरोग्य सेवेला रिक्त पदांचा आजार जडला आहे.परभणी जिल्ह्यात आरोग्य विभागाचे जाळे सर्वत्र पसरले असून विशेषत: उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. मात्र याच ठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होतो. परभणी येथे जिल्हा रुग्णालयात विविध विभागांमध्ये वर्ग १ ची अधिकारी पदे रिक्त आहेत. परभणी जिल्ह्यात वर्ग १ ते ४ ची एकूण ५५७ पदे मंजूर आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालय, गंगाखेड, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय, जिंतूर, बोरी, मानवत, पाथरी, पालम, पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालय यांचा समावेश आहे. वर्ग १, २ ची पदे ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे असून ही पदे शासनस्तरावरुन आरोग्य संचालकांमार्फत भरण्यात येतात. परंतु, परभणी जिल्ह्यामध्ये वर्ग १ ची २७ पदे रिक्त आहेत. तर वर्ग २ ची दोन पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक विभागांना पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत. तसेच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने इतर जिल्ह्यातून तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलाविले जाते अथवा इतर जिल्ह्यात जावून तपासणी करण्याची वेळ रुग्णांवर येते. रिक्त असलेल्या वर्ग १ च्या पदांमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया), वैद्यकीय अधिकारी (भिशक), बधीरिकरण, नेत्र शल्यचिकित्सक, अस्थीव्यंग उपचार तज्ज्ञ, कान, नाक, घसा वैद्यकीय अधिकारी, क्षय रोग चिकित्सक अधिकारी, चर्मरोग वैद्यकीय अधिकारी ही पदे रिक्त असल्याने रुग्णांना उपचाराअभावी परत जाण्याची वेळ येते. ही पदे त्वरित भरण्यात यावीत, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे.
आरोग्यसेवेला रिक्त पदांचा आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 23:49 IST