कडा : आष्टी तालुक्यात साथीचे आजार फैलावू नयेत, यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने जनजागरण मोहीमेसह फवारणी, अॅबेटिंग केले जात आहे. अनेक आजार दुषित पाण्यामुळे फैलावत असल्याने नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्यासह इतर सूचना आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येत आहेत. आष्टी तालुक्यातील लोकसंख्या साधारणत: सव्वादोन लाख आहे. या लोकांना तालुक्यातील आष्टी,कडा, टाकळसिंग, धामणगाव, कुंठेफळ, सुलेमान देवळा या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर ३८ आरोग्य उपकेंद्रातून आरोग्य विषयक सेवा पुरविल्या जात आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ताप, डेंग्यू, मलेरिया, अतिसार आदी साथीचे आजार फैलावू नयेत, यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बापू चाबुकस्वार यांनी सांगितले. या मोहिमेअंतर्गत आष्टी, कडा, धामणगाव, दौलावडगाव, धानोरा या प्रमुख गावांसह इतर वीस ते पंचेवीस गावांमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी विविध उपक्रम राबवित आहेत. या मोहिमेमध्ये आरोग्य विभागातील तब्बल ४३ कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी गावागावांत जाऊन अॅबेटिंग करीत आहेत. पावसाळ्यात ग्रामीण भागात गावांमध्ये अनेकदा रस्त्याच्या बाजूला किंवा इतर ठिकाणी डबके साचलेले आहेत. तसेच नाल्या कोंडल्यामुळेही घाण पाणी साचलेले असते. अशा डबक्यांमध्ये डासांची संख्या वाढते. यामुळे थंडी, ताप हे साथीचे आजार फैलावतात. यामुळे डेंग्यू होण्याची शक्यता असल्याने अशा डबक्यांमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अॅबेटिंग केले. ज्या ठिकाणी घाण आहे व दलदल आहे अशा ठिकाणी बीएससी पावडरही टाकण्यात आली. यामुळे रोगराई फैलावणार नाही, असा विश्वासही आरोग्य विभागाच्यावतीने व्यक्त करण्यात आला. अनेकदा साथीचे आजार दुषित पाणी पिल्यामुळेही होतात. अतिसारासारखे आजार फैलावू नयेत यासाठी नागरिकांना शुद्ध पाणी पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले. तसेच लहान मुलांना पाणी उकळून थंड झाल्यानंतर गाळून पाजावे , पाणवठे स्वच्छ ठेवावेत तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे मार्गदर्शनही गावागावांत ग्रामस्थांना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले. सध्या ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यामुळे विहिरी, कूपनलिकांचेही पाणीही गढूळ झाले आहे. सदर पाणी ग्रामस्थांनी पिताना योग्य ती काळजी घ्यावी व साथीचे आजार फैलावू नयेत यासाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले असल्याचे डॉ. बापू चाबुकस्वार यांनी सांगितले. (वार्ताहर)
आष्टी तालुक्यात आरोग्य जागृती
By admin | Updated: August 12, 2014 01:56 IST