वाशी : येथील वीज कंपनीच्या गोडावूनमधून कनिष्ठ तंत्रज्ञानेच (लाईनमन) विजेचे साहित्य चोरी केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला असून, कनिष्ठ अभियंत्यांनी लाईनमनसह त्यास मदत करणाऱ्या अन्य एकास रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. येथील पारा रोडवर वीज कंपनीचे ३३/११ कार्यालय असून, कनिष्ठ अभियंता यांच्या अधिपत्याखाली असलेल्या गोडावूनमधून गेल्या काही दिवसापासून विजेचे साहित्य चोरीस जात असल्याचे निदर्शनास आले होते. या चोरीचा छडा लावण्यासाठी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सदरचे साहित्य चोरी करणाऱ्यावर पाळत ठेवली. कर्मचारी निवासामध्ये असलेल्या वीज सहित्याच्या गोडावूनमधून आतापर्यंत अर्थिंग पाईप, एबी स्वीचचे पाईप, फ्यूज वायर, लक्झ, सर्व्हिस वायर, जेआय वायर आदी साहित्याची चोरी होत होती. याबाबत कनिष्ठ अभियंता वैभव मदने यांनी साहित्य ठेवलेल्या निवास (गोडावून) वर पाळत ठेवण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास लाईनमन (कनिष्ठ तंत्रज्ञ) रणजीत भागवत कसबे हा सदरच्या साहित्य ठेवलेल्या खोलीत प्रवेश करून साहित्य चोरून नेत असल्याचे दिसून आले. मदने यांनी त्यास रंगेहात पकडून त्याच्यासह मदत करणाऱ्या अन्य एका इसमासही पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास हवालदार नितीन पाटील करीत आहेत. दरम्यान, एकीकडे शेतकऱ्यांनी विजेच्या साहित्याची मागणी केली असता त्यांना साहित्य नसल्याचे सांगण्यात येत असतानाच दुसरीकडे मात्र वीज कंपनीचाच कर्मचारी सहित्याची चोरी करून भंगारात विक्री करत असल्याचे उघडकीस आल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
लाईनमनला रंगेहाथ पकडले
By admin | Updated: June 9, 2014 00:09 IST