फैजुल्ला पठाण , धावडामनामध्ये जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणत्याही संकटाशी सामना करणे शक्य असल्याचा प्रत्यय सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेस बसलेल्या एका विद्यार्थ्यांकडून अनुभवास आला. धावडा गावच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भोरखेडा (ता. भोकरदन) येथील युवक सागर नारायण सोनवणे ( वय १९ ) हा मकर संक्रांतीनिमित्त सागर आणि त्याचा मित्र नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी औरंगाबादला जात होते. फुलंब्रीजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन या धडकेत सागर हा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले होते. परंतु सागरची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला शासकीय रु ग्णालयात (घाटी ) हलविण्यात आले होते. मात्र मागील गेल्या दीड महिन्यापासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या सागरने मंगळवारी पहाटे ३ वाजेला शेवटचा श्वास घेतला.मराठीचा पेपर सोडविण्यासाठी जाणाऱ्या छोट्या भावाला मोठ्या भावाच्या निधनाची बातमी कळताच छोटा भाऊ दु:खाने खचून खाली बसला. परंतु, मोठ्या दादाला दिलेले वचन पूर्ण करून दादाला खरी श्रध्दाजंली अर्पण करायची या हेतूने त्याने परीक्षा दिली. नाटेश्वर विद्यालयातील विद्यार्थी संदीप नारायण सोनवणे याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मोठ्या भावाने शिक्षण बाजूला ठेवून लहान भाऊ मोठा अधिकारी व्हावा या उद्देशाने हाडांची काड करून लोकांच्या घरी मोलमजुरी करावयास सुरूवात केली. आपली स्वत:ची स्वप्ने आपला भाऊ पूर्ण करेल या भाबड्या आशेने कामास जुटलेल्या भावाचा अपघात होतो तो ही सणासुदीच्या दिवशीच. संक्रांतीच्या दिवशीच अपघात झालेल्या सागर सोनवणेची मृत्यूशी झुंज मंगळवारीपर्यंत सुरु होती. इकडे लहान भाऊ संदीपही भावाच्या औषधोपचारासाठी झटत होता. ही मरमर थांबली. तिही संदीपच्या दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशीच.
भावाच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून त्याने दिला दहावीचा पेपर
By admin | Updated: March 2, 2016 23:08 IST