औरंगाबाद : महापालिकेचा निम्मा कारभार सध्या प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २९ अधिकारी अतिरिक्त पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. शासकीय नियमांप्रमाणे सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस अतिरिक्त कार्यभार ठेवता येत नाही. जे अधिकारी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ कार्यभार सांभाळतात त्यांचा पदभार त्वरित काढावा, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे.महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या पदावर शासननियुक्त अधिकारीच नेमावेत, असा नियम आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून शासनाकडून आलेल्या अधिकाऱ्यांना रुजूच करून घेण्यात आले नाही. प्रतिनियुक्तीवर मनपाचेच अधिकारी वरिष्ठपदांवर सत्तारूढ झाले आहेत. काही अधिकारी तर मागील दोन ते तीन वर्षांपासून अतिरिक्त म्हणून काम पाहत आहेत.सहा महिन्यांपेक्षा अधिक वेळ अतिरिक्त म्हणून एखाद्या अधिकाऱ्यांकडे पदभार सोपवायचा असेल तर त्यासाठी स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे गरजेचे आहे. मनपा प्रशासनाने आजपर्यंत अशी कोणतीही मान्यता घेतलेली नाही. मनपातील शाखा अभियंता के. एम. फालक यांच्याकडे ७ वर्षे ७ महिन्यांपासून उपअभियंता पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्याखालोखाल अशोक पद्मे यांच्याकडे ३ वर्षे ८ महिन्यांपासून उपअभियंता पाणीपुरवठा विभागाचा भार आहे.उपअभियंता यू.जी. शिरसाट यांच्याकडे यांत्रिकी विभागाचा २ वर्षे ५ महिन्यांपासून भार आहे. उपअभियंता अफसर सिद्दीकी यांच्याकडे ड्रेनेज विभागाचे प्रमुख म्हणून ८ महिन्यांपासून अतिरिक्त कारभार आहे. लेखा विभागातील लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडेही ७ महिन्यांपासून मुख्य लेखाधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.
मनपाचा निम्मा कारभार प्रभारींवर अवलंबून
By admin | Updated: October 5, 2016 01:15 IST