कळमनुरी : विधानसभा मतदारसंघात ३३६ मतदान केंद्रावर दर अर्ध्या तासाला अधिकाऱ्यांची भेट राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी पत्र परिषदेत दिली.दर अर्ध्या तासाला केंद्रीय निरीक्षक (आॅब्झर्व्हर), निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आदी अधिकाऱ्यांची भेट होणार आहे. यातील कोणताही अधिकारी मतदान केंद्रावर येऊन पाहणी करणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले कळमनुरी मतदान केंद्र क्रमांक ७७ व ग्रामपंचायत कार्यालय औंढा मतदान केंद्र क्र. १७७ या दोन मतदान केंद्रावर वेब कॅमेरा बसविण्यात येणार आहे. कोणालाही येथील मतदान प्रक्रिया पाहता येणार आहे. तसेच मतदान केंद्र क्र. ७७ व १७७ प्रशाला आखाडा बाळापूर, मतदान केंद्र क्र. २४८, खेर्डा येथील मतदान केंद्र क्र. १, जि. प. प्रा. शा. जवळा पांचाळ केंद्र क्रमांक ३०१ या पाच केंद्रावर शुटींग कॅमेरा (स्टॅटीक व्हिडीओ कॅमेरा) लावण्यात येणार आहे. केंद्र सरकार नियुक्त ५ मॉयक्रो आॅर्ब्झव्हर नेमण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहे. मतदारांना यादीतील नाव व काही अडचण असल्यास ते सोडविणार आहेत. अंगणवाडी सेविका, आरोग्याच्या प्राथमिक सुविधा येथे उपलब्ध राहणार आहेत. येथील मतदान केंद्र क्र. ७७ मधून ७७ (अ) हे अतिरिक्त मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांना त्यांच्या साहित्यासह मतदान केंद्र व सोडण्यासाठी ३२ रुटवर, २५ बस, ५१ जीप, ८ मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. १४ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना तहसील कार्यालयात बोलावण्यात आले आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत मतदान केंद्रावर सर्व कर्मचाऱ्यांना पोहोचविण्यात येणार आहे. ३२ क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे एक राखीव इव्हीएम मशीन देण्यात येणार आहे. औंढा नागनाथ, आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, नांदापूर या पाच ठिकाणी इव्हीएम मशीन तज्ज्ञ ठेवण्यात येणार आहे. उमेदवारांना फक्त तीनच वाहने वापरता येणार आहेत. एक स्वत:साठी, दुसरे निवडणूक प्रतिनिधीसाठी, तिसरे वाहन त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी वापरता येणार आहे. उमेदवारांना कोणतीही आपल्या नावाची पोलचिट वाटता येणार नाही. मतदान केंद्रावर ५०० पेक्षा जास्त महिला मतदार असतील तर तेथे महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत चिकुर्ते, शाम मदनुरकर, के. एस. विरकुंवर, गजानन वानखेडे, शिवाजी पोटे, पठाण आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
अर्ध्या तासाला केंद्रांना भेटी
By admin | Updated: October 13, 2014 23:33 IST