बीड : पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार आगाराकडून बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांचा वाढता ओघ पाहता अर्ध्या तासाला एक बसगाडी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे.आषाढीच्या अनुषंगाने १६४ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ५ जुलैपासून त्या-त्या आगानुसार बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. बीड आगारातून सर्वाधिक २६ बसगाड्या दररोज मार्गस्थ होत आहेत. मंगळवारपर्यंत ८ बसगाड्या मार्गस्थ होत होत्या. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता बुधवारपासून १५ बसगाड्या सोडण्यात आल्या असल्याचे स्थानकप्रमुख शंकर स्वामी यांनी सांगितले. पावसाने ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण झाले आहे. भाविकांचा उत्साह दुपटीने वाढला असून सकाळ आणि सायंकाळच्या वेळी येथील बसस्थानकाला यात्रेचे स्वरूप येत आहे. ग्रामीण भागातील बसगाडीचा स्थानकात प्रवेश होताच पंढरपूरला जाणाऱ्या गाडीची सोय करावी लागत असल्याचे स्थानकप्रमुख एस. व्ही. स्वामी यांनी सांगितले. गुरूवारपासून दिवसाकाठी २६ बसगाड्या सोडण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक ए. ए. जानराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
आषाढी वारीसाठी अर्ध्या तासाला बस
By admin | Updated: July 14, 2016 01:13 IST