संजय जाधव , पैठणपैठण तालुक्यात मार्च व फेब्रुवारीदरम्यान झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने शेकडो गावांतील हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल, कृषी व पं.स. प्रशासनाच्या संयुक्त समितीने यासंदर्भात चुकीचे पंचनामे करून गावेच्या गावे शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवली आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी २ जून रोजी पैठण येथे उपोषण केले होते. यावेळी ८ दिवसांच्या आत पंचनामे करण्याचे आश्वासन तहसीलदार संजय पवार यांनी शेतकऱ्यांना देऊन वेळ निभावून नेली; मात्र ३० दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर पुढे काहीच न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.गारपीट व अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासंदर्भात राज्य शासनाने २० मार्च रोजी आदेश जारी केले होते. यात शेती किंवा बहुवार्षिक फळ पिकांच्या ५० टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या क्षेत्रांना, तसेच जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्रापर्यंत मदत देण्यात येणार असल्याचे शासनाने घोषित करून मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने पारित केले होते.कोऱ्या पंचनाम्यावर घेतल्या सह्या पैठण तालुक्यात चुकीचे पंचनामे झाल्याने हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. पंचनामे करताना गावागावातून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कोऱ्या पंचनाम्यावर शेतकरी व साक्षीदाराच्या सह्या घेण्यात आल्या व नंतर त्यावर नुकसानीची टक्केवारी टाकण्यात आली. अशा पद्धतीने विश्वासघात करण्यात आल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन पंचनामे करावेत, असे आदेश असताना या तिघांनी मिळून कोठेही पंचनामे केले नाहीत. यातील एक जणाने एकूण गावात एक बैठक घेऊन पंचनामे केले. गावातील प्रमुख शेतकरी, राजकीय वजन असलेले शेतकरी यांचेच नुकसान ५० टक्क्यांच्या वर दाखविण्यात आले, तर सर्वसामान्यांचे नुकसान ५० टक्क्यांच्या आत दाखवून त्यांना वगळण्यात आले; परंतु शेतकऱ्यांकडे २ हेक्टर क्षेत्र असतानाही १ हेक्टर क्षेत्राची नोंद घेण्यात आली. काही ठिकाणी ४८ टक्के, तर ४६ टक्के अशी नोंद घेऊन वगळण्यात आले.५० टक्क्यांच्या आत नुकसान दाखविलेपैठण तालुक्यातील शेकडो गावांतील प्रशासनाच्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी पंचनामे केले; मात्र त्यात शेतकऱ्यांचे नुकसान हे ५० टक्क्यांच्या आत दाखवून त्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. शेतकऱ्यांना समिती सदस्यांचे धक्कादायक उत्तर याबाबत अनेक शेतकऱ्यांनी या समितीच्या सदस्यांना विचारणा केली असता ‘नुकसान ५० टक्क्यांच्या आत दाखवावे, असा वरिष्ठ स्तरावरून आमच्यावर दबाव आहे, असे धक्कादायक उत्तर देण्यात आले. आम्ही हे सांगितले म्हणून वरिष्ठांना सांगू नका; नाही तर आमची नोकरी धोक्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकाराने पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना जाणूनबुजून मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे.फळबागांचे पंचनामेच नाहीततालुक्यात प्रशसनाच्या वतीने फक्त शेती पिकांचे पंचनामे करण्यात आले. यातून फळबागा सरसकट वगळण्यात आल्या. वास्तविक पैठण तालुक्यात मोसंबी, डाळिंब, केळी आदींसह अनेक फळपिकांचे नुकसान झाले आहे.पंचनाम्याच्या अजब तऱ्हाहार्षी येथील शेतकरी आबासाहेब आगळे यांच्या ६०० मोसंबीच्या झाडांचे फळासह नुकसान झाले. तलाठी व ग्रामसेवकांनी कोऱ्या पंचनाम्यावर सह्या घेतल्या. नंतर त्याचे नाव यादीत आलेच नाही.ब्रह्मगाव येथील फळबागांच्या चारही बाजूने गारपिटीचा पंचनामा केला व मधोमध असलेले फळबागांचे क्षेत्र गारपीट झाली म्हणून वगळले. यासंदर्भात गावातील शेतकऱ्यांनी ७ एप्रिल रोजी तहसीलदार संजय पवार यांच्याकडे लेखी तक्रार केली; मात्र या तक्रारीची अद्याप दखल घेतली नाही, असे या गावकऱ्यांचे म्हणणे आहे.शेतकऱ्यांच्या भावना तीव्रअवकाळी पाऊस, सोबत गारपीट व नंतर वादळाने पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यातच पावसाचे आगमन न झाल्याने संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला आहे. या परिस्थितीत प्रशासनाच्या बेफिकीर वृत्तीने शेतकरी संतप्त झाला आहे. या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. प्रशासनाने वेळीच भानावर येऊन कामास लागावे, उद्रेकाची वाट पाहू नये, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांचे नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिली.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा विश्वासघात
By admin | Updated: July 7, 2014 00:42 IST