हदगांव : पगार काढताना ग्रामसेवकांच्या उपस्थितीचे रजिस्टर बघितल्या जाते, परंतु या रजिस्टरवर कंत्राटी ग्रामसेवकाने चक्क रविवारी स्वाक्षऱ्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे येथील पंचायत समितात सावळागोंधळ सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.अनेकांनी कार्यालयीन सुटीच्या दिवशी स्वाक्षरी केल्याने दुसरा व चौथ्या शनिवारी कार्यालयाला सुटी असते़ परंतु सुटीच्या दिवशीही स्वाक्षऱ्या केल्या आहेत़ येथील पंचायत समितीचा सावळागोंधळ सुरु असल्यामुळे अनेक गावांतील विकासकामे खोळंबली आहेत़ काही ग्रामसेवकाने जादा निधी येणारी गावे चिरीमिरी देवून चार-चार गावांचा कारभार मिळविला आहे़ आठ महिन्यांपासून अनेक ग्रामसेवकांना काम न करताच पगार मिळत आहे़ याविषयी कक्ष अधिकारी ए़एम़ बेग यांना विचारले असता त्यांनी कानावर हात ठेवले़ उपस्थित न राहता एकाच दिवशी येवून सरसकट स्वाक्षऱ्या करण्याचा प्रकार समोर आला आहे. आदिवासीबहुल गावे माळझरा, तरोडा, चोरंबा, केदारगुडा, सावरगाव, खरबी, कळसवाडी, चोरंबा बु़, गायतोंड या गावांना ठक्करबाप्पा योजनेअंतर्गत व आदिवासी प्रकल्प विभागामार्फत भरपूर निधी असतो़ यावर डोळा ठेवून काही ग्रामसेवक सदर गावे आपल्या पदरात पाडून घेतात़ याउलट अनेक गावांत एक-दोन महिने ग्रामसेवकांचे पद रिक्त असतात़ यामुळे येथील विकासाची कामे खोळंबतात़ मनाठा व सावरगाव येथे अफरातफर करणारा ग्रामसेवक, वायफना येथे अपहार करणारा ग्रामसेवक यांच्यावर ४२० चा गुन्हा दाखल करण्याचे सीईओंचे पत्र येवूनही कारवाई गुलदस्त्यातच आहे याचे गौडबंगाल कळेना़ येथे बायोमेट्रीक मशीन सुरू केली़ सकाळी अंगठा मारला, उपस्थिती एकदाची दाखवली की कर्मचारी मोकळे होतात़ मग कार्यालयीन वेळेतच हॉटेल, बँका, मित्रमंडळी, सोयरेधायरे भेटी ही कामे केली जातात़ यामुळे अनेकांना हेलपाटे मारावे लागतात़ तासन्तास ताटकळत बसावे लागते़ गटविकास अधिकारी वेगवेगळ्या बैठकांसाठी जिल्हा किंवा फिल्डवर असतात़ याचा फायदा ही मंडळी घेतात़ हा सर्व प्र्रकार एक माजी फौजी व आता कंत्राटी ग्रामसेवक असणाऱ्यां कलने यांनी उघड केला़ हे येथे आठ महिन्यांपासून कार्यरत आहेत़ निवडणूक काळात, साक्षरता अभियान त्यांनी सांगितलेल्या त्या गावी जावून काम केले़ परंतु ज्या मस्टरवर स्वाक्षऱ्या करायच्या असतात त्या हजेरीपटावर त्यांचे नावच नसल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला़ तर कक्ष अधिकाऱ्यांनी तुम्ही सात महिन्यांपासून सतत गैरहजर असल्याचे त्यांना खडसावले़ ज्या माणसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण केले त्यांच्या वाट्यालाही अशी अपेक्षा यावी, हे किती दुर्दैव़ त्यांना ७ हजार रुपये पगार आहे़ परंतु जेव्हापासून ते उपस्थित झाले तेव्हापासून त्यांचा एकही पगार काढला नाही़ कारण कक्ष अधिकाऱ्यांना दक्षिणा न दिल्याने़ ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्ष पांडुरंग श्रीरामवार यांच्या कानावर हा प्रकार गेल्याने आठ-दहा ग्रामसेवक संबंधित कक्ष अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यासाठी गेले असता मस्टर पाहून ते चक्रावले़ याविषयी ते सीईओ व बीडीओकडे तक्रार करणार असल्याचे संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितले़ १२५ गावांसाठी ८५ ग्रामसेवकतालुक्यात १२५ ग्रामपंचायती असून त्यासाठी ८५ ग्रामसेवक आहेत़ कंत्राटी पद्धतीने गेल्या नऊ महिन्यांपासून ९ ग्रामसेवकांची नियुक्ती करुनही त्यांना अद्याप खेड्याचा कारभार दिला नाही़ जी़आऱमध्ये स्वतंत्र खेडी दिल्याशिवाय ग्रामसेवकाचा पगार निघत नाही, असा उल्लेख आहे़ परंतु हदगावच्या कक्ष अधिकाऱ्यांना हा नियम मान्य नाही़ ते चिरीमिरी घेवून ग्रामसेवकाचा पगार बिनधास्त काढतात़
हदगाव पं.स.त गैरप्रकार
By admin | Updated: June 21, 2014 00:57 IST