औरंगाबाद : जिल्ह्यात बारा दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उद्या सोमवारी सायंकाळी थांबणार आहे. प्रचाराची मुदत संपत असल्यामुळे सायंकाळनंतर उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार नाही. विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्व नऊ मतदारसंघांत १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १ आॅक्टोबर रोजी संपली. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच जिल्ह्यात प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. यावेळी जिल्ह्यात तब्बल १५६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडाला आहे. सर्वच उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करीत आहेत. मात्र, आता उद्या सोमवारी सायं. ५ वा. प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. जाहीर प्रचाराची मुदत मतदान संपण्याच्या वेळेआधी ४८ तास म्हणजे १३ आॅक्टोबर रोजी सायं. ५ वा. संपत आहे. त्यामुळे या मुदतीनंतर उमेदवारांना लाऊडस्पीकर लावून प्रचार करता येणार नाही. तसेच पदयात्रा, प्रचारसभा, बैठका आदीही घेता येणार नाहीत. दूरचित्रवाणी वाहिन्या, नभोवाणी वाहिन्या आणि केबल नेटवर्कवरून सोमवारी सायंकाळी ५ वाजेपासून १५ आॅक्टोबर सायं. ५ वाजेपर्यंत मतदारांवर प्रभाव टाकून निवडणूक निकालांवर प्रभाव टाकू शकेल अशा स्वरूपाचे कोणतेही कार्यक्रम प्रक्षेपित, प्रसारित करण्यास आयोगाने मनाई केली आहे. १९५१ च्या लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या १२६ व्या कलमानुसार असे कार्यक्रम प्रक्षेपित करण्यास बंदी आहे. या कायद्याच्या कलम १२६ अ नुसार मतदानोत्तर चाचण्या आणि इतर निवडणूक सर्वेक्षणांचे निकालही या कालावधीत प्रसिद्ध करण्याची परवानगी नाही.
तोफा आज थंडावणार
By admin | Updated: October 13, 2014 00:35 IST