उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने खूप मोठे महत्त्व आणि वारसा आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या आणि तो संकलित करुन लेखणीबद्ध करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. याशिवाय ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची कागदपत्रे, दस्तऐवज, वस्तू यांचे जतन व्हावे, यासाठी कायमस्वरुपी संग्रहालय तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून ज्या-ज्या नागरिकांना यासाठी माहिती अथवा इतर संदर्भ देणे शक्य आहे, त्यांनी ती लिखित स्वरुपात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी आज प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील इतिहातज्ज्ञ, अभ्यासक यांच्याशी संवाद साधला. यावेळी या संकल्पनेची माहिती डॉ. नारनवरे यांनी दिली. तसेच उपस्थितांकडून ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीच्या सूचनाही ऐकून घेतल्या. यावेळी इतिहास अभ्यासक डॉ. सतीश कदम, स्वातंत्र्य सैनिक बुवासाहेब जाधव, मदन कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याशिवाय शिवकालीन, निजामकालीन अनेक संदर्भ तसेच प्राचीन काळी जिल्ह््यातील विविध गावांचे असलेले महत्त्व लक्षात घेता त्यासंदर्भातील माहिती गोळा करण्यात येणार आहे. अनेक नागरिकांकडे त्या-त्या काळातील मूळ कागदपत्रे आहेत. त्यांचा अभ्यास करणे, ती शास्त्रीयदृष्ट्या जतन करणे, मोडी, उर्दु, पर्शियन भाषांतील दस्ताऐवजाचे भाषांतर करुन त्या काळातील परिस्थिती, इतिहास अभ्यासणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू राहणार आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने इतिहास लेखन, वारसा व ठेवा संकलनाचे हे काम अतिशय महत्त्वपूर्ण असून, प्रत्येक नागरिक, संस्था यांचा सहभाग यात महत्त्वाचा आहे. तेर नगरी, तुळजापूर यासह प्राचीन वारसा लाभलेली शहरे, श्री क्षेत्र कुंथलगिरी, उस्मानाबादचा दर्गा यासह जिल्ह््यातील अनेक गावांना स्वत:चा वारसा आणि इतिहास आहे. हाच वारसा सर्वांसमोर यावा, त्याचे जतन व्हावे, ही या मागची संकल्पना आहे. नागरिकांकडून प्राप्त होणारा प्राचीन दस्तऐवज सुरक्षित रहावा व येणार्या पिढ्यांनाही तो पाहता यावा यासाठी कायमस्वरुपी संग्रहालय निर्माण करणार असल्याचे डॉ. नारनवरे म्हणाले. (प्रतिनिधी) केवळ जिल्ह्यातील नव्हे तर ज्या ज्या नागरिकांकडे उस्मानाबाद जिल्ह्याविषयीचे संदर्भ साहित्य उपलब्ध आहे. तसेच येथील ऐतिहासिक ठेव्यांबद्दल माहिती उपलब्ध आहे त्यांनी ती माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय (जुनी इमारत) येथील संकलन कक्षात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय उस्मानिया विद्यापीठ, भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे, राष्ट्रीय संग्रहालय, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, दिल्ली, लंडन म्युझियम, डेक्कन कॉलेज आदी संस्थांकडेही जिल्ह्याविषयीचा ऐतिहासीक दस्तऐवज आहे का, हे पाहिले जाणार आहे.
जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा होणार लेखणीबद्ध
By admin | Updated: June 3, 2014 00:46 IST