---
सोन्याची शुद्धता दर्शविणारे मानांकन म्हणजे हॉलमार्कचे दागिने विकणे बंधनकारक करण्यात येत आहे. सोने शुद्धतेची मोहर दागिन्यांवर लागल्याने असे दागिने खरेदी करणारा ग्राहक व सराफा व्यापारी यांच्यातील नाते आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे.
---
प्रश्न : हॉलमार्कमुळे विश्वासार्हता वाढेल का ?
उत्तर - हॉलमार्कमुळे नक्कीच सराफा व्यावसायिकांवरील ग्राहकांची विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल. ग्राहकांना शुद्ध सोने मिळावे, हीच या मागची सरकारची भावना आहे. मुळात सराफा व्यवसायात मोठमोठ्या नामांकित कंपन्या उतरल्याने स्पर्धा वाढली आहे. तसेही बहुतांश सराफा व्यापारी ग्राहकांना फसवत नाहीत. कारण, शुद्ध सोने दिले नाही तर तो ग्राहक पुढच्यावेळी दुकानात येणार नाही. व्यावसायिकांना आपला पारंपरिक ग्राहक जपणे व नवीन ग्राहक वाढविणे हेच आता लक्ष्य आहे. यामुळे नामांकित सराफा व्यावसायिक पहिल्यापासूनच आपल्या नावाची मोहर त्या दागिन्यावर उमटवत होते. यामुळे फसविण्याचे काही कारणच नव्हते. हॉलमार्क हे ग्राहकांच्या समाधानासाठी आहे. हॉलमार्क म्हणजे बीआयएचे त्रिकोणी चिन्ह दागिन्यावर मारले जाते. त्यासोबतच सोन्याची शुद्धता, तो दागिना कधी बनविला, असेसिंग सेंटरची ओळख, ज्याने दागिना बनविला त्या सराफाच्या ओळखीचे चिन्ह याचा समावेश दागिन्यावर असतो. यामुळे ग्राहकाच्या मनात दागिन्याच्या शुद्धतेबद्दल कोणतीही शंका राहत नाही. हॉलमार्क असल्याने सराफा व्यावसायिक व ग्राहक यांच्यातील नाते दृढ होण्यास नक्कीच मदत होणार आहे.
प्रश्न : हॉलमार्कमुळे ग्राहकांच्या फसवणुकीला आळा बसेल का?
उत्तर: बहुतांश सराफा व्यापारी ग्राहकांना शुद्ध सोने देतात. ते किती शुद्धतेचे आहे हे बिलावर नमूदही करतात. मात्र, काही बोटावर मोजणारे व्यावसायिक असतील की त्यांनी कधी ग्राहकांना फसविले असेल तर त्यांच्यामुळे संपूर्ण व्यावसायिकांना बदनाम केले जाते, हे चुकीचे आहे. ग्राहक आता हॉलमार्क पाहूनच सोन्याचे दागिने खरेदी करतात. ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. निश्चितच हॉलमार्कमुळे ग्राहकांची होणारी फसवणूक टळेल. यासाठी विश्वासातील, नामांकित सराफा व्यापाऱ्यांकडून दागिने खरेदी करा. एका दागिन्यावर हॉलमार्क करण्यासाठी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो व त्याचे शुल्क ३५ रुपयांपर्यंत असते. यामुळे ग्राहकांवर त्याचा अतिरिक्त बोजा पडत नाही.
प्रश्न : येत्या काळात सोने-चांदीच्या दरात घट होईल की वाढ?
उत्तर : मागील ५० वर्षांपासून मी सराफा व्यवसायात आहे. पाच दशकांचा अनुभव असा आहे की, सोने असो वा चांदी, दोघांच्या किमती वाढतच गेल्या आहेत. मागील दहा वर्षांतील दर पाहिले तरी हे लक्षात येईल. आज सोने ४८ हजार रुपये प्रती तोळा आहे. मध्यंतरी ५१ हजारांपर्यंत भाव पोहोचले होते, तर चांदी आज ७० हजार रुपये प्रती किलो आहे. मध्यंतरी ७२ हजारांपर्यंत चांदी पोहोचली होती. दोन ते तीन हजार रुपयांची तेजी-मंदी येत असते. अर्थव्यवस्थेत झालेल्या रिकव्हरीमुळे औद्योगिक मागणी वाढली आहे. डाॅलरमध्ये घसरणीमुळे सोन्याच्या किमतींना सपोर्ट मिळत आहे. देशात लग्नसराईमुळे मागणी वाढली आहे. येत्या काळात सोने व चांदीचे भाव आणखी वाढतील. मागील वर्षी सोन्याने २८ टक्के परतावा दिला आहे. अडचणीच्या वेळी सोने विकले तर नगदी रक्कम लगेच मिळते. गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे.