सतीश जोशी , परभणीपरभणी जिल्हा नियोजन आणि विकास समितीची (डीपीडीसी) बैठक पुन्हा एकदा निधी वाटपावरुन गाजली. पालकमंत्री सुरेश धस आणि जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते बाळासाहेब जामकर यांच्यात शाब्दीक चकमक झाली. निषेधार्थ बाळासाहेब जामकर यांच्या पाठोपाठ समितीचे २४ पैकी २१ सदस्य सभागृहाबाहेर पडल्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला होता. येथील बी. रघुनाथ सभागृहात गुरुवारी सकाळी ही सभा पार पडली.आम्ही सूचविलेल्या तातडीच्या आणि आवश्यक कामांना मंजुरी देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी या सदस्यांनी पालकमंत्र्यांसमोर केली होती. आपण सूचविलेल्या प्रस्तावावर आम्ही स्वाक्षरी करणार नाहीत, आमची त्यास मंजुरी नसेल, असा पवित्रा या सदस्यांनी घेतल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. यानंतर पालकमंत्री सुरेश धस हे ही संतप्त झाले. तुमच्या मंजुरीची गरज नाही, असे सांगितल्यामुळे सदस्य आक्रमक झाले. यातच पालकमंत्र्यांच्या विधानामुळे मान-अपमान नाट्यास प्रारंभ झाला आणि समितीचे सदस्य तथा परभणी जि. प. चे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर यांनी निषेध करीत सभात्याग केला. त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मण मुंडे हे ही बाहेर पडले. हे दोघे सभागृहाबाहेर पडताच इतर सदस्यही त्यांच्या पाठोपाठ सभागृहाबाहेर आल्यामुळे व्यासपीठावरील नेते मंडळीही चकित झाली. कदाचित असे घडेल, असे या नेते मंडळींनाही वाटले नाही. व्यासपीठावर पालकमंत्री सुरेश धस यांच्यासह जि. प. अध्यक्षा मीनाताई बुधवंत, खा. संजय जाधव, आ. सीताराम घनदाट, आ. मीराताई रेंगे, आ. बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, मनपा आयुक्त अभय महाजन आदी अधिकारी- पदाधिकारी उपस्थित होते. अशा गोंधळातच काही प्रस्तावांना मान्यता देऊन ही सभा संपली. या सभेत पाणीपुरवठा योजना, जिल्हा पर्यटन विकासनिधी आदी संदर्भात निर्णय घेण्यात आला. तसेच केकरजवळा आणि बनवस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामास परवानगी देण्यात आली. बाळासाहेब जामकर झाले संतप्तसभागृहातून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब जामकर, लक्ष्मण मुंडे, मीनाताई राऊत, गंगाधर कदम, आदी सदस्य मंडळी बी. रघुनाथ सभागृहाच्या एका कक्षामध्ये एकत्र जमली होती. तत्पूर्वी बाळासाहेब जामकर सभागृहाबाहेर पडल्यानंतर आ.बाबाजानी दुर्राणी आणि राकाँ जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी जामकर यांना सभागृहाच्या पडद्यामागे भेटून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, संतप्त झालेल्या बाळासाहेब जामकर यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर आ. दुर्राणी आणि विजय भांबळे हे जामकर यांना सर्व सदस्यांसोबत भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सायंकाळी पालकमंत्री आणि जामकर यांच्यात बैठक झाल्याचे कळले असले तरी जामकर आणि त्यांच्या सहकारी सदस्यांची नाराजी दूर झाली की नाही, हे कळले नाही.
पालकमंत्री-सदस्यांत मतभेद
By admin | Updated: June 27, 2014 00:08 IST