पाटोदा : तालुक्यात अद्यापही पाऊस न पडल्याने केवळ दोन हजार हेक्टरवरच पेरण्या झालेल्या आहेत़ पेरलेले धान्य उगवले आहे़ मात्र आठ ते दहा दिवसापासून पाऊस नसल्याने हे पीकही कोमेजून जात आहे़ यामुळे दुबार पेरणीचे संकट आहे़पावसाळा सुरु होऊन दीड महिना लोटला तरी अद्यापही पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे़ खरिपाच्या सरासरी क्षेत्राच्या केवळ चार ते पाच टक्के पेरण्या झाल्य आहेत़ या नंतर पाऊस न पडल्याने थोडेसे उगवलेले धान्यही आता संकटात आले आहे़ पाटोदा तालुक्यात गतवर्षी ७४० मि़ मी़ पाऊस झाला होता़ या पावसावर जवळपास ४९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या़ यामध्ये कापूस, सोयाबीन, मूग आदी धान्याचा समावेश होता़यावर्षी आतापर्यंत सरासरीच्या केवळ दहा ते बारा टक्केच पाऊस झाल्याने दोन हजार हेक्टरवरच पेरण्या झाल्या आहेत़ यात कपूस, बाजरी, मका यांचा समावेश आहे़ पेरलेले बियाणे उगवून वर आलेले आहे़ या मध्ये आता शेतकरी अंतर्गत मशागत करु लागला आहे़ मात्र गेल्या आठ ते दहा दिवसापासून तालुक्यात काहीच पाऊस न झाल्याने उगवलेले पीकही आता कोमेजून चालले आहे़शेतकऱ्यांनी मशागतीसह बियाणे, खत यावर मोठा खर्च केला आहे़ मात्र पावसाअभावी हे पेरलेले धान्यही संकटात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे़ (वार्ताहर)
उगवलेले बियाणेही पावसाअभावी संकटात
By admin | Updated: July 21, 2014 00:20 IST