अभयारण्यात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जाळपट्टे घेतले जातात व त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. तथापि, अद्यापपर्यंत निधी उपलब्ध झालेला नाही. यावर्षीची परिस्थिती वेगळी असून, जंगलात जास्त गवत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कडेला उद्यापासून जाळपट्टे घेण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. अर्थात, त्यासाठी लागणाऱ्या मजुरांना निधी उपलब्ध झाल्यानंतरच मजुरी देण्यात येणार आहे, असे नागद परिक्षेत्राचे आधिकारी व कन्नड विभागाचा अतिरिक्त कारभार सांभाळणारे सागर ढोले यांनी सांगितले.
चौकट
विघ्नसंतोषींची कर्मचाऱ्यांना धास्ती
गौताळा अभयारण्य हे पानगळीचे जंगल आहे. अगोदरच यंदा मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यात पुढील महिन्यापासून पानगळीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आग लागल्यास विझविण्याची डोकेदुखी वाढणार आहे. आगीमुळे खुरट्या झुडपांचे आस्तित्व धोक्यात येऊ शकते, तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जीवितालाही आगीमुळे धोका पोहोचू शकतो. आगीचा धोका कमी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला जाळपट्टे घेणे आवश्यक आहे. जनावरांना चराईबंदी व गवत कापून नेण्यास बंदी घातल्याने मने दुखावलेले विघ्नसंतोषी लोक जंगलाला आग लावण्याचा प्रकार करू शकतात, अशी भीती वनकर्मचाऱ्यांना वाटत आहे.
फोटो : गौताळा अभयारण्यातील वाळत असलेले गवत.