शिरुर अनंतपाळ : कडधान्य उत्पादनास हमी भाव मिळत नसल्याने कडधान्य उत्पादक शेतकर्यांची संख्या घटत चालली असून, शेतकरी दिवसेंदिवस नगदी पिकांकडे वळत असल्याने कडधान्य उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिरुर अनंतपाळ तालुक्यातील आठ गावातील शेतकरी गटाने हालकी येथे कडधान्य हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले असून, या खरेदी केंद्रावर आज पर्यंत अडीच कोटीची उलाढाल झाल्याने कडधान्य उत्पादक शेतकर्यांना चांगलाच फायदा झाला आहे. कडधान्य उत्पादनास हमी भाव मिळत नसतानाच अवकाळी पावसाचा अन वादळी गाराचा मारा सहन करावा लागत असल्याने शेतकरी हरभरा, तूर आदीचे उत्पादन घेण्यासाठी धजावत नाहीत, त्यामुळे कडधान्य उत्पादक शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुक्यातील आठ गावातील शेतकर्यांनी शेतकरी गटाची स्थापना करून त्याची शासनाकडे रीतसर नोंदणी केली आणि हालकी येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. गेल्या दोन महिन्यापासून या खरेदी केंद्रावर हरभरा, तूर आदी कडधान्याची खरेदी सुरू झाली असून, अडीच कोटी रुपयाची उलाढाल सुरू झाली आहे. शिवाय ज्या शेतकर्यांनी या केंद्रावर आपल्या कडधान्याची विक्री केली आहे ते सर्व शेतकरी या गटाचे भागधारक झाले आहेत. या खरेदी केंद्रास तालुका कृषी कार्यालयाचे तालुका कृषी अधिकारी डी.बी. सुतार, अनंत गायकवाड, पाटील, कृषी सहायक चामले यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे सर्व व्यवहार धनादेशाद्वारे झाले आणि बाजारपेठेत होणारी पिळवणूक थांबली. (वार्ताहर) हमीभावाचा फायदा हमीभाव खरेदी केंद्रावर तुरीला चार हजार तीनशे आणि हरभर्यास तीन हजार शंभर रुपये हमीभाव मिळाल्याने शेतकर्यांना या हमीभावाचा चांगलाच फायदा झाला आहे. परिणामी खरेदी केंद्रावर कडधान्य विक्रीस शेतकर्यांनी रांगा लावल्या आहेत. अद्यापि हमीभाव खरेदी केंद्र सुरू आहे.
कडधान्य उत्पादकांना ‘हमीभावाचा’ आधार
By admin | Updated: May 14, 2014 01:05 IST