---
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात पीएम केअर फंडातून मंजूर ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन खा. डाॅ. भागवत कराड यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ‘ॲडिशनल प्रेशर स्विंग अँड ॲब्झाॅर्बशन’ प्लांटद्वारे ऑक्सिजन घाटीला पुढील १५ दिवसांत उपलब्ध होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मेडिसिन इमारतीच्या मागच्या बाजूस यासाठी जागा निश्चित करण्यात आली. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे बांधकाम सोपविले आहे. ते काम पुढील ७ दिवसांत पूर्ण होईल, तर यंत्रसामग्री इन्स्टाॅलेशनसाठी ७ दिवसांचा अवधी लागणार असून, पुढील १५ दिवसांत रुग्णांना ऑक्सिजन मिळू शकेल. आमदार अतुल सावे, भाजप शहर अध्यक्ष संजय केणेकर, माजी महापौर बापू घडामोडे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, राष्ट्रीय राजमार्ग प्रधिकरण औरंगाबाद विभागाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, अभियंता अनिल कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
एक हजार लिटर प्रति मिनिटप्रमाणे २०० मोठे ऑक्सिजन सिलिंडर प्रति दिवसाला ऑक्सिजन या प्लांटद्वारे मिळणार आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता घाटी रुग्णालयामध्ये एक हजार एलपीएम टँकचे काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून दिवसाला १०० लिटर प्रति मिनिटप्रमाणे २०० मोठे सिलिंडर इतका ऑक्सिजन तयार होईल. त्यामुळे घाटी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी बाहेरून ऑक्सिजन घेण्याचे प्रमाण कमी होईल. देशभरात ४०० प्लांट उभारले जात आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांंकडे केलेल्या मागणीचा त्यांनी तातडीने विचार केला आणि या प्रकल्पाला मंजुरी दिली. पी. एम. केअर फंडामधून हे काम केले जात असल्याचे डाॅ. कराड यांनी सांगितले.