उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन वर्षेपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत आहे. परिणामी भू-जल पातळी कमालीची खालावली आहे. भूजलसर्वेक्षण विभागाच्या वतीने आॅगस्ट महिन्यांच्या पहिल्या आठवडयात आठ तालुक्यात विविध विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार भू-जलपातळी तब्बल १२.३४ मिटरपर्यंत खोल गेली आहे. जिल्ह्यात मागील काही वर्षांत बोअरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीउपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. असे असतानाच तीन-चार वर्षांपासून पावसाचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे जलस्त्रोतांसोबतच भू-जल पातळीतही अपेक्षित प्रमाणात वाढली नाही. परिणामी ऐन पावसाळयात अनेक गावांतील सार्वजनिक जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे संबंधित गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या टँकरची संख्या १४९ वर जावून ठेपली आहे. पाऊस वेळेत न पडल्यास ही संख्या आणखी वाढणार आहे. मागील पाच वर्षांतील खालावलेलया सरासरी भूजल पातळीचा विचार केला असता जवळपास साडेतीन टक्क्यांनी अधिक खोल गेली आहे. ही बाब सर्वांसाठीच चिंतेची मानली जात आहे. त्यामुळे भू-जल पातळी उंचावण्यासाठी आता कठोर पाऊले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. भू-वैज्ञानिक कार्यालयाकडून जिल्ह्यातील विविध ११४ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असता भूम तालुक्याची भूजल पातळी तब्बल १३.२१ मिटर, कळंब ११.०४, लोहारा ११.५३, उमरगा १२.४९, उस्मानाबाद १२.१२, परंडा १२.८९, तुळजापूर १२.१४ तर वाशी तालुक्याची भूजल पातळीही सर्वाधिक १३.३४ ने खालावली आहे. आठही तालुक्यांची सरासरी विचारात घेता भूजल पातळी १२.३४५ मिटरने खोल गेली आहे. सर्वाधिक चिंताजनक स्थिती वाशी तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे भू-जल पातळी उंचाविण्यासाठी आता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
भू-जल पातळी १२ मीटरने खालावली !
By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST