राजेंद्र बेलकर, करमाडऔरंगाबाद शहरालगत वाढत जाणारी नागरी वस्ती व एम.आय.डी.सी.मुळे तालुक्यात अतिक्रमणाचा त्रास सर्वत्र वाढतो आहे. आता या अतिक्रमणाचा प्रवास वृक्षवेलीकडेही होऊ लागल्याने पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड वाढल्याने करमाड, पिंप्रीराजा, वरझडी, वडखा, जसपूर, लाडसावंगी, आडगाव (सरक) व दुधड परिसरातील वनराई नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.करमाड व परिसरातील डोंगरमाथे बोडखे झाले आहेत. वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन व संरक्षण करण्यासाठी सामाजिक वनीकरण, वनविभाग, वन्यजीव विभाग व कृषी विभाग प्रयत्नशील असतो; परंतु या चारही विभागांच्या नाकर्तेपणामुळे व एकदा वृक्षारोपण करून आपले कर्तव्य संपले या प्रवृत्तीमुळे चोरट्या मार्गाने व दिवसाढवळ्या वृक्षाची तोड चालू आहे.करमाड परिसरात वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करमाड, गाढेजळगाव, मंगरूळ, एकलहेरा, दुधड, बनगाव, जयपूर, नागोणीची वाडी, सटाणा, वडखा व वरझडी या गावच्या डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर वृक्षाची लागवड झाली. येथील वृक्ष चांगले वाढले. रॉकेल व गॅसच्या टंचाईमुळे पर्यायी व्यवस्था म्हणून पर्यायी जळतन म्हणून या लावलेल्या वृक्षाकडे परिसरातील लोकांनी आपला मोर्चा वळविला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षाची कत्तल सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी तालुक्यातील निसर्गप्रेमींकडून होत आहे. हप्तेखोरीकडे लक्ष...जबाबदारीकडे दुर्लक्षसंबंधित अधिकारी व कर्मचारी हप्तेगिरीत बांधले गेल्यामुळे त्यांचे आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होत आहे. याचा फायदा घेत या क्षेत्रातील मंडळी गब्बर होत आहे. लाकडांचे भाव चारशे रुपये प्रति क्विंटल झाल्याने सर्वसामान्य व्यक्तींना हा भाव परवडत नसल्याने रस्त्यावरील व डोंगरावरील दिसेल ते झाड तोडण्याचा सपाटा वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वृक्षांच्या कत्तलीमुळे परिसरातील वनराई नष्ट होण्याच्या मार्गावर आहे; परंतु याचे वनविभाग व सामाजिक वनविभागाला काही एक सोयरसुतक नाही.वाढत्या शहरीकरणामुळे लाकूडतोड वाढलीएमआयडीसी शेंद्रा क्षेत्र विकसित होत असल्याने काही कंपनीसाठी व हॉटेलसाठी लाकडाची मागणी वाढत चालली आहे. याचा फायदा या क्षेत्रात असलेल्या लाकूडतोड मंडळींनी घेतला. सर्रासपणे बाभूळ, लिंब, जांभूळ व आंबा या झाडांची तोड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सॉ मिलसाठी मोठे लाकूड तर इतरांसाठी जळतण म्हणून लाकडाला चांगला भाव आला आहे. त्यासाठी त्रास नको म्हणून या मंडळींनी वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाला हप्ते चालू करून ट्रक व टेम्पोद्वारे सर्रासपणे लाकडाची वाहतूक सुरु केली, तसेच शेकडो टन लाकडाची साठवणूक सुरु केली आहे.
वनराईला लागली दृष्ट
By admin | Updated: July 12, 2014 00:57 IST