औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीच्या प्रक्रियेला वेग दिला जात आहे. प्रकल्पासाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा) आणि महावितरणने हिरवा कंदिल दाखविणे आवश्यक आहे. आगामी आठवडाभरात परवानगीची ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.विमानतळ प्राधिकरणाला दर महिन्याला ४० लाख रुपये वीज बिल महावितरणला अदा करावे लागते. यामुळे विमानतळाची विजेची गरज भागविण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय प्राधिकरण अधिकाऱ्यांनी घेतला आहे. विमानतळावर उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पातून पाच मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. विमानतळ प्राधिकरण प्रारंभी या प्रकल्पातून ३ मेगावॅट वीज निर्माण करणार होते; परंतु या प्रकल्पातून महावितरणलाही वीज देण्यात येणार असल्याने आता हा प्रकल्प ५ मेगावॅटचा करण्यात येत आहे. महावितरण या प्रकल्पातून किती वीज खरेदी करणार, याची परवानगी वाणिज्य विभागाच्या मुख्य अभियंत्याकडून घेण्यात येईल. त्यानंतर मेडाची परवानगी घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया लवकरात-लवकर पूर्ण करण्यासाठी सुटीच्या दिवशी काम करण्यात येत आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी या प्रकल्पाचा प्रस्ताव आणि परवानगीसंदर्भातील आवश्यक ती कामे केली. प्रकल्पातून महावितरण जास्त वीज खरेदी करणार असेल तर परवानगीचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी महावितरणच्या मुंबई कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर ‘मेडा’ची परवानगी घेतली जाणार आहे.
सौरऊर्जा प्रकल्पाला मिळणार हिरवा कंदिल
By admin | Updated: December 15, 2015 00:00 IST