जालना : नगर पालिकेने स्वच्छतेच्या कामासाठी साहित्य खरेदीच्या सादर केलेल्या प्रस्तावास नगरविकास मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखविला आहे.पालिका हद्दीतील स्वच्छतेच्या कामांची जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी पंधरा दिवसांपूर्वी स्वत: पाहणी केली. स्वच्छता विभागांतर्गत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांबरोबर हितगुज केले. विशेषत: स्वच्छता विभागांतर्गत अडीअडचणीबाबत तपशिलवार चर्चा केली. त्यातून शहर स्वच्छता यंत्रणेचा आढावा घेतला, तेव्हा अनेक गोष्टी निदर्शनास आल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नायक यांनी स्वच्छतेच्या कामाकरिता तात्काळ साहित्य खरेदीचा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयास सादर करावा, असे आदेश बजावले होते. त्याप्रमाणे पालिकेच्या अध्यक्षा पद्मा भरतिया व मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी नगरविकास मंत्रालयास साहित्य खरेदीसाठीचा तपशिलवार प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावातून स्वच्छतेच्या कामाकरिता १०० हातगाड्या, १६ घंटागाड्या, १० कंटेनर, ९ डप्परप्लेसर, १ कॉम्पेक्टर, १ हॅक्यूम अॅटीवर, १ मिनीलोडर, १ जेटींग मशीन, १ स्लिपींग मशीन, १०० बिन्स तसेच घनकचरा व्यवस्थापनाकरिता हॅड्रोलिक सिडी असलेले एक वाहन, ४०७ टाटा हॅड्रोलिक वाहन व १ जेसीबी असे एकूण दीड ते दोन कोटी रुपयांचे साहित्य प्रस्तावित केले. नगरविकास मंत्रालयाने सादर केलेल्या प्रस्तावाची तपासणी केली व त्यास तत्त्वत: मान्यता बहाल केली आहे. या मंजूर प्रस्तावामुळे पालिका प्रशासनास आता साहित्य खरेदीसाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती नगराध्यक्षा पद्मा भरतिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, या साहित्य खरेदीकरिता पालिका प्रशासनास आता वित्त आयोगाकडे निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रस्ताव दाखल करुन मंजुरी घ्यावी लागणार आहे, तरच स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल. (प्रतिनिधी)कर्ज काढून साहित्य खरेदी-भरतियानगरविकास मंत्रालयाने या साहित्य खरेदीस हिरवा कंदिल दाखविल्यानंतर आता पालिका प्रशासनाने वित्त आयोगास निधीच्या तरतुदीसाठी प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त आयोगाकडून जास्तीत-जास्त तरतूद प्राप्त व्हावी तसेच उर्वरित खर्चासाठी कर्ज काढावे, असा पालिकेचा होरा आहे.येथील नगरपालिका प्रशासनास घनकचरा पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छतेच्या कामाकरिता साहित्य खरेदीस मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता. पालिका प्रशासनाने त्यातून वाहनांसह साहित्य खरेदी केले होते. परंतु त्या वाहनांसह साहित्याबाबत अभ्यास करावा, अशी विदारक परिस्थिती आहे. खरेदी केलेल्या साहित्यासह त्याच्या दर्जाबाबत आनंदीआनंद आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य साहित्य खरेदीसुध्दा वादग्रस्त ठरु नये, अशी अपेक्षा जाणकारातून व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने यात दखल घ्यावी, असा सूर आहे.
साहित्य खरेदीस हिरवा कंदिल
By admin | Updated: July 6, 2014 00:23 IST