बीड : भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखी ‘ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोष अशा भक्तिमय वातावरणात रविवारी सकाळी संत मुक्ताबाई व संत ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंदपंत ऊर्फ श्रीधरपंत यांच्या भेटीचा सोहळा पार पडला. यावेळी शेकडो वारकरी व भाविकांनी हा क्षण ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला.संत मुक्ताबार्इंची पालखी मुक्ताईनगरातून पंढरपूरकडे निघाली आहे. दोन दिवस या दिंडीचा मुक्काम बीडमधील बालाजी मंदिरात होता. रविवारी ही पालखी सकाळी साडेसहा वाजता जैन भवनाजवळील गोविंदपंत ऊर्फ श्रीधरपंत यांच्या समाधी स्थळी दाखल झाली. यावेळी संत मुक्ताबार्इंचे आजोबांच्या समाधीजवळ डॉ. धनंजय रामदासी यांच्या हस्ते पादुकापूजन करण्यात आले. त्यानंतर वारकऱ्यांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करीत विविध अभंग गायिले. त्यामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. संत मुक्ताबाई पालखीचे प्रमुख डॉ. रवींद्र हरणे पाटील यांचा राधाकृष्ण वाव्हळ यांनी सत्कार केला. त्यानंतर वारकऱ्यांनी बीडचा निरोप घेतला. रविवारी पाली येथे पालखी विसावून सोमवारी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. (प्रतिनिधी)
आजोबा-नातीच्या भेटीचा रंगला भक्तिमय सोहळा
By admin | Updated: July 4, 2016 00:30 IST