नांदेड : वेतनातील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात ५०० हून अधिक ग्रामसेवक २ जुलैपासून काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत़ परिणामी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे़ दरम्यान, गटविकास अधिकाऱ्यांनी संपात सहभागी झालेल्या ग्रामसेवकांना पहिली नोटीस बजावली असून कामावर परत न आल्यास कारवाईचा इशारा दिला आहे़ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी एकच असल्यामुळे कालबद्ध पदोन्नतीमध्ये त्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे ग्रामसेवक संवर्गात नाराजी पसरली होती़ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी २ जुलैपासून राज्यभरातील ग्रामसेवक संपावर गेले आहेत़ ग्रामसेवकांनी वर्षभरात अनेकवेळा संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन, मोर्चा, कामबंद आंदोलन करण्यात आले. परंतु याबाबतचा तोडगा मात्र अद्यापही निघाला नाही. ८७ हून अधिक मूळ कामे सांभाळत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी ग्रामसेवकांमार्फत केली जाते. राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या जवळपास १३८ योजनांचा भार ग्रामसेवकांवर आहे. या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ग्रामसेवकांची आपल्याकडील ग्रामपंचायतीच्या चाव्या, शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत़ १४ आणि १५ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर औरंगाबाद विभागातील ग्रामसेवकांनी धरणे, निदर्शने केली़ यामध्ये जिल्ह्यातील ग्रामसेवकही सहभागी झाले होते़ जिल्ह्यात जवळपास ९०० ग्रामसेवक आहेत़ यातील ५०० हून अधिक ग्रामसेवक संपात सहभागी झाले आहे़ जिल्ह्यातील एका ग्रामसेवक संघटनेने या आंदोलन सहभाग घेतला नाही़ तसेच कंत्राटी ग्रामसेवकही सहभागी झाले नाहीत़ त्यांच्याकडे सध्या ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला आहे़ जिल्ह्यात संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु़ए़ कोमवाड यांनी दिली़ तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांनी या नोटीसा ग्रामसेवकांना बजावल्या आहेत़ त्याचवेळी राज्यभरात सुरू असलेल्या या आंदोलना जिल्ह्यातील ग्रामसेवकही सहभागी झाले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागे घेण्यात येणार नसल्याची प्रतिक्रिया संघटनेचे विभागीय अध्यक्ष एऩडी़ कदम यांनी दिली़ (प्रतिनिधी)
ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प
By admin | Updated: July 17, 2014 00:22 IST