ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होताच ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने काहींचा हिरमोड झाला असला तरी पॅनल करून सरपंच पद मिळविण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच गावपातळीवरील राजकीय पुढारी आपलाच सरपंच होणार यासाठी आपापले पॅनल उभारत आहेत. सध्या सिल्लोड तालुक्यातील गावागावांमध्ये निवडणुकीचा माहोल बनला असून नवसे, गवसे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, १५ जानेवारीनंतर नव्याने सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने सरपंच होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या काही भावी सरपंचांचा या निवडणुकीत मात्र हिरमोड झाला आहे. सध्या सर्वच जण पॅनल करून निवडणुकीची तयारी करीत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी काय काय डावपेच आखले पाहिजेत याचीच चर्चा सध्या गावागावांतील चहाटपरी, बसस्टॉप, पारावर बसून अनेक जण करीत असल्याचे चित्र दिसत आहे.