लातूर : लातूर जिल्ह्यात ४६ टँकरने पाणीपुरवठा होत असून, पाणीपुरवठ्याच्या फेऱ्यात गोलमाल होत असल्याचा पर्दाफाश ‘लोकमत’चमुने स्टिंग आॅपरेशनद्वारे रविवारी केला़ याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने खाजगी टँकरला जीपीएस सिस्टीम बसविली असून, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा अधिकाऱ्यांनी या संदर्भात निर्देश देऊन, टँकर फेऱ्या मंजुरीनुसार करण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत़लातूर जिल्ह्यात ४६ टँकरपैकी २७ टँकर खाजगी आहेत़ उर्वरीत १९ टँकर शासकीय आहेत़ संगणकीय प्रणालीद्वारे टँकर फेऱ्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहेत़ टँकरने किती फेऱ्या केल्या़ अधिग्रहण ते संबंधीत पाणीपुरवठा करण्यात येणारे गाव किती अंतरावर आहे, याचे मोजमाप संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे़ गेल्या ८ दिवसांपूर्वीच जीपीएस सिस्टीम प्रत्येक टँकरसाठी कार्यान्वीत करण्यात आली आहे़ दरम्यान, ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर याला अधिक गती आली असून, जिल्ह्यातील दहाही तहसीलदार, दहा गटविकास अधिकारी व पाच उपविभागीय अधिकाऱ्यांना फेऱ्या मंजुरीनुसार करण्याचे निर्देश दिले आहेत़ त्यानुसार या अधिकाऱ्यांनी संबंधीतांना सुचनाही केल्या आहेत़ लातूर जिल्ह्यातील शाम नगर, रामेगाव तांडा, बाभळगाव, महाराणाप्रताप नगर, गंगापूर, दर्जीबोरगाव, महाळंग्रावाडी, विळेगाव, घारोळा, हाडोळी, हणमंत जवळगा, आष्टा, नारायण नगर या तेरा गावात कुठे एक तर कुठे दोन अशा एकूण १३ फेऱ्या कमी झाल्याचे स्टिंग आॅपरेशननंतर उघडकीस आले़ याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, खाजगी टँकरला जीपीएस सिस्टीम बसवून कंट्रोल करण्याचे नियोजन केले आहे़ शासकीय टँकरच्या फेऱ्यांवरही लक्ष केंद्रीत केले असून, अधिग्रहण केलेल्या पाण्याची शुद्धता तपासली नसेल, तर त्याची तपासणी करावी, असेही आदेश आहेत. (प्रतिनिधी)
खाजगी टँकरला जीपीएस सिस्टीम
By admin | Updated: April 7, 2015 01:23 IST