हिंगोली : ग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकाम करताना नियमांना हरताळ फासला जात असल्याने विभागीय आयुक्तांनी कडक सूचना दिल्या आसून पालिका क्षेत्रालगतच्या ग्रामपंचायतींनी नगररचना विभागाच्या सहमतीनेच बांधकाम परवानगी देण्यास बजावले आहे. ग्रा. पं. क्षेत्रात इमारत बांधकाम परवानगी घेण्याच्या तरतुदींमध्ये २0१४ मध्ये सुधारणा केली आहे. गावठाण हद्द व त्याबाहेरच्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी आहेत. त्यानुसार त्यात ज्या गावाकरिता प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार प्रारुप किंवा अंतिमरीत्या प्रादेशिक योजना प्रसिद्ध करण्यात आली असेल अशा कोणत्याही गावांच्या गावठाण क्षेत्रामध्ये इमारत बांधकामाविषयी नगर अधिकाऱ्यांच्या सहमतीने परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्या गावाकरिता प्रारुप अथवा अंतिम प्रादेशिक योजना प्रसिद्ध झालेली आहे, अशा गावांच्या गावठाण हद्दीबाहेर इमारत बांधकाम परवानगीसाठी जिल्हाधिकारी किंवा त्यांनी जबाबदारी सोपविलेल्या तहसीलदारांपेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी नगररचना अधिकाऱ्यांची सहमती आवश्यक आहे. जेथे प्रारुप झाले नाही अशा ठिकाणी ग्रा. पं. लाच अधिकार असले तरी नगररचना अधिकाऱ्यांची सहमती आवश्यक आहे. मालमत्ता हस्तांतरण करताना १00 रुपयांपेक्षा अधिक किंमत असल्यास त्या दस्तावेजाची नोंदणी करणे आवश्यक आहे. ते न केल्यास हस्तांतरण ग्राह्य धरता येत नाही. तथापि कर निर्धारणावेळी असे दस्तावेज ग्राह्य धरतात. ते चुकीचे आहे. ग्रामपंचायतीला निहित होईल किंवा संपादित केलेल्या कोणत्याही स्थावर मालमत्तेला तीन वर्षांपेक्षा अधिक मुदतीसाठी पट्ट्याने देणे किंवा तिची विक्री हस्तांतरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येत नाही. तसे केल्यास ते नियमबाह्य आहे.
ग्रा.पं. क्षेत्रातील बांधकामांबाबत आयुक्तांनी दिल्या कडक सूचना
By admin | Updated: December 24, 2015 23:59 IST