हिंगोली : विविध मागण्यांकडे शासनाने लक्ष न दिल्यामुळे १ आॅगस्ट पासून महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाभरात बेमुदत संप सुरू केला आहे. ५ आॅगस्टपासून या संपात अधिकारीही सहभागी झाल्यामुळे शासकीय कामे ठप्प झाली आहेत.ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी उपलब्ध नसल्याने कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. या संपामुळे महसूलचे कामकाज थंडावले आहे. मागील महिन्यात शाळा, महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांचे काम अर्धवट अवस्थेत असताना महसूलच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान, मराठा व मुस्लिम समाजास शासनाने नव्याने तयार केलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात समाविष्ट केले आहे. त्यामुळे मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण लागू केल्याने जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी आदी प्रमाणपत्रांसाठी नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीची गरज लागत आहे. मात्र महसूल दिनापासून नायब तहसीलदारांसह महसूल कार्यालयातील लिपिक, कारकून आदी कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपाचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याने एकूणच जिल्ह्यातील महसूलचे कामकाज मागील सहा दिवसांपासून थंडावले आहे. (प्रतिनिधी)जिल्हाधिकारी कार्यालयातही सामसूमजिल्ह्यात महसूल कर्मचारी संंघटनेच्या वतीने महसूल दिनापासून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.यामध्ये जवळपास अडीचशे कर्मचारी सहभागी झाले आहेत.दरम्यान ५ आॅगस्टपासून ३ उपजिल्हाधिकारी, ५ तहसीलदार, १५ नायब तहसीलदारांनीही या संपात भाग घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत उपविभागातही नागरिकांनाही या संपाचा फटका बसला आहे. औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. शासनाने कोणत्याही मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे महसूलचे अधिकारी देखील या संपात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत हा संप सुरू ठेवण्यात येणार आहे. - प्रवीण फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली.
सहाव्या दिवशीही शासकीय कामे ठप्प
By admin | Updated: August 7, 2014 00:17 IST