मदन बियाणी , कनेरगाव नाकाआॅक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात सलग चार दिवस सुट्यांची मेजवाणी शासकीय कर्मचाऱ्यांना लाभली खरी परंतु विधानसभा निवडणुकीमुळे सुट्यांचा हा आनंद हिरावणार असेच चित्र दिसून येत आहे. सुट्या असूनही त्यांचा उपभोग घेता येणार नसल्याचे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना २ आॅक्टोबरला गांधी जयंती, ३ आॅक्टोबरला दसरा, तर ५ आॅक्टोबरला रविवार अशा ३ दिवसांच्या सुट्यांचा योग जुळून आला आहे. ४ आॅक्टोबर शनिवार असल्यामुळे या दिवसाची रजा टाकल्यास चाकरमान्यांना सलग ४ दिवस सुट्यांचा आनंद लुटता येऊ शकतो. काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तर जेमतेम महिनाभरापूर्वी या सुट्यांमध्ये पर्यटन अथवा नातेवाईकांच्या गावाला जाण्याचे नियोजनही करून ठेवले आहे. मात्र नेमक्या याच कालावधीत विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजल्याने शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांसह निवडणूक कामामध्ये ड्युटी लागलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आनंदावर तर विरजन पडले आहे. प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, राज्य शासनाचे इतर अधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही या निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याने नाईलाजाने त्यांनाही या सुट्यांचा आनंद लुटण्याचा मोह सोडावा लागणार असे दिसते. निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना १५ आॅक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीच्या कामकाजाची तयारी म्हणून दोन दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापैकी पहिले प्रशिक्षण सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दुसरे प्रशिक्षण आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येण्यार आहे. परिणामी, महसूल कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ या सर्वाचाही रसभंगच झाला, असचे म्हणावे लागेल. सुट्ट्यांच्या या योगा-योगामुळे खरे तर दिवाळीपूर्वीच एका छोट्या सहलीच्या मेजवानीचा आनंद लुटता आला असता. मात्र निवडणुकीच्या धामधुमीत हा आनंद लोप पावणार असल्याने शासकीय कर्मचारी नाराज झाले आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचा हा मोठा काळ अनुभवताना ‘कही खुशी कही गम’ अशीच अवस्था कर्मचारी व अधिकाऱ्यांची झाली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्यांवर संक्रांत
By admin | Updated: September 23, 2014 01:34 IST