उस्मानाबाद : दुष्काळ हा काही नवीन नसून सध्या उद्भवलेली चारा, पाणी टंचाई ही सरकारचे पाप आहे. वरवरच्या कितीही उपायोजना केल्या तरी शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. शेतकऱ्याच्या शेतीमालाला जोपर्यंत किफायतशीर दर मिळणार नाही, तोपर्यंत हे चित्र बदलणे शक्य नाही. मात्र, दुर्दैवाने या शासनाला शेतीमालाचे दर वाढविण्यात रस नसल्याचे मत शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. पाटील म्हणाले की, सध्याचे सरकार उद्योगपती धार्जिने आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही दणेघेणे नाही. निवडणुकीच्या काळात सध्याच्या भाजप सरकारने जाहीरनाम्यात शेतीमालाला उत्पादनखर्च वगळता ५० टक्के अधिक नफा होईल, असा दर देऊ असे वचन दिले होते. परंतु, त्यांनी हे वचन पाळलेले नाही. शेतीमालाल जे काही दर मिळत आहे, त्यातून साधा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याचे ते म्हणाले. शासन ८० रूपये किलो दराने तूरदाळ आणि ४५ रूपेय किलो दराने कांद्याची आयात करीत आहे. हा दर स्थानिक शेतकऱ्यांना का दिला जात नाही, असा सवालही त्यांनी केला. सध्या सिनेअभिनेते शेतकऱ्यांना आर्थिक मदत करीत आहेत. ही बाब चांगली असली तरी अशा स्वरूपाच्या मदतीमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होणार नाही. कर्जबाजारी शेतकऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतीमालाचे दर वाढविण्यात शासनाला रस नाही !
By admin | Updated: September 17, 2015 00:27 IST