पुरूषोत्तम करवा माजलगावमागील निवडणुकांमध्ये आपण स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईवर निवडून आलो. मात्र, यापुढे त्यांच्या पुण्याईवर निवडून येणे अशक्य आहे. आता स्वकर्तृत्वावर निवडणुका लढवाव्या व जिंकाव्या लागतील, अशी जाहीर कबुली पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी दिली.येथे भाजप संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी त्यांनी गटातटाच्या राजकारणाबद्दल नाराजी व्यक्त करून नेते व कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले.आ. आर. टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे, डॉ. प्रकाश आनंदगावकर, डॉ. अशोक तिडके, राजाभाऊ मुंडे, गोरख धुमाळ, किसन नाईकनवरे, नितीन नाईकनवरे, नगराध्यक्ष सहाल चाऊस, अरूण राऊत, हनुमान कदम यांची उपस्थिती होती.पंकजा मुंडे म्हणाल्या, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. माजलगाव मतदारसंघात पक्षाचा आमदार असताना एकही उमेदवार जिंकू शकला नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी दमछाक झाली, अशी नाराजी त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली. यातून काहीतरी शिका. गट-तट विरून एक दिलाने भाजपची संघटन बांधणी करा, असा सल्लाही त्यांनी दिला. आजचे रोडरोलर उद्याचे कमळ असेल, असे सूचक विधान करून त्यांनी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले.पालकमंत्र्यांनी गटातटावर नेत्यांसमोरच भाष्य केल्याने वातावरण काहीसे गंभीर बनले होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीच्या काही बंडखोर उमेदवारांसोबत छुपी युती केली होती त्यामुळे भाजपच्या मताचे विभाजन होऊन पक्षाला त्याचा मोठा फटका बसला होता. पंकजा मुंडे यांचा नाराजीचा सूर आ. देशमुख यांच्या दिशेने होता हे लपून राहिले नाही.
गोपीनाथ मुंडेंच्या पुण्याईवर निवडून येणे आता अशक्य
By admin | Updated: April 17, 2017 23:30 IST